Goa SIR Success Special Intensive Revision 
नाशिक

Nashik SIR Verification | 'एसआयआर' प्रक्रिया अंतिम टप्प्यात; नाशिक जिल्ह्यात मयत, स्थलांतरित अन् अनुपस्थित मतदारांची यादी प्रसिद्ध

Nashik SIR Verification | मयत, स्थलांतरित, अनुपस्थितांची यादी संकेतस्थळावर : प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघे सहा दिवस

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेली मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, एसआयआरअंतर्गत अनुपस्थित असलेल्या नागरिकांसह स्थलांतरित आणि मयत मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, विविध मतदारसंघांतील स्थानिक कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि. ४) या याद्यांचे वाचन केले जाणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील मतदारांना आपली माहिती अद्ययावत करण्यासाठी अवघे ६ दिवस शिल्लक राहिले असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी तब्बल ३७ लाख १० हजारांहून अधिक मतदारांच्या एसआयआर पडताळणीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. सद्यःस्थितीला जिल्ह्यातील एकूण काम वेगाने पूर्ण केले जात आहे.

अंतिम टप्प्यात 'बीएलओ' ॲक्टिव्ह मोडवर आले असून, या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विशेष मोहीम राबवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक आणि मतदार यादीतील दुबार नावांची अचूक माहिती संकलित केली जात आहे.

गोळा झालेली ही सर्व माहिती 'ईसीआयनेट' प्रणालीवर अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, ज्या नागरिकांनी अद्याप आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता येत्या सहा दिवसांत ती पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मतदारांना ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा मोबाइल ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेही पूर्ण करता येणार असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक काम झालेल्या मतदारसंघांमध्ये दिंडोरी, इगतपुरी सारखे ग्रामीण तालुके आघाडीवर असून, शहर परिसरात तुलनेत कमी काम झाल्याचे दिसून येत आहे.

यात नाशिक पश्चिम मतदारसंघात अवघे ४०.४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या भागातील कायमस्वरूपी स्थलांतरित नागरिकांचे व पत्ता बदललेल्या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने नाशिक पश्चिम मतदारसंघातील एसआयआरचे काम अजूनही मागे असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT