अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली Pudhari
नाशिक

Nashik Accident | वणी-सापुतारा रस्त्यावर कार-दुचाकीची धडक: दुचाकी जळून खाक; १ ठार, दोघांची प्रकृती गंभीर

पांडाणेजवळ भीषण अपघात, अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने पूर्णपणे जळून खाक झाली

पुढारी वृत्तसेवा

Vani Saputara Road Car Bike Accident

वणी : वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवारी (दि. १०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१५ जेव्ही-१२५९ क्रमांकाची दुचाकी वणीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी एमएच-४१ एझेड-३४९८ क्रमांकाची कार सापुताराच्या दिशेने जात होती. पांडाणे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे (४९, रा. खोबळा, ता. सुरगाणा) यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात विजय शेखरे (वय २१) आणि रेखाबाई विजय शेखरे ( वय २०), दोघेही रा. खोबळा, ता. सुरगाणा, हे गंभीर जखमी झाले. रेखाबाई शेखरे यांची प्रकृती अति गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, कारचालकासह कारमधील आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याचेही समोर आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पांडाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल महाले, परिचारिका सविता ससाणे, शैला गावित आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्याची कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघाताची नोंद वणी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस हवालदार वसंत साबळे पुढील तपास करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT