Nashik Vani Leopard Sighting Pudhari
नाशिक

Vani Leopard | वणीतील सप्तशृंगी नगरात बिबट्याचा वावर; कारखालील कुत्र्याला ओढून नेल्याचा संशय

कुत्र्यांचे भुंकणे अचानक थांबले; घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले, वन विभागाची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Nashik Vani Leopard Sighting

वणी : वणी शहरातील सप्तशृंगी नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली असलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच कुत्र्याशी झटापट झाल्याचे संकेत आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास सप्तशृंगी नगर परिसरातील कुत्रे अचानक जोरजोरात भुंकू लागले. काही वेळाने अचानक भुंकण्याचा आवाज बंद झाला. सकाळी रहिवाशांनी परिसराची पाहणी केली असता, दररोज या भागात दिसणारे एक कुत्रे गायब असल्याचे आढळून आले. परिसरातील इतर कुत्रीही भयभीत होऊन लपून बसल्याचे नागरिकांनी सांगितले.

सप्तशृंगी नगरातील गणेश देशमुख, मनोज खांडवी आणि राहुल मोरे यांनी रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज अचानक बंद झाल्याचे सांगितले. तसेच अनिल राठोड यांच्या घरातील पाळीव कुत्र्यालाही बिबट्याची चाहूल लागल्याने ते लपून बसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील तीन ते चार कुत्री गायब असल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे.

घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे

परिसरातील रस्त्यावर बिबट्याच्या छोट्या-मोठ्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. तसेच कुत्रा आणि बिबट्यामध्ये झटापट झाल्याचे संकेतही घटनास्थळी दिसून आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भागात बिबट्याचा नियमित वावर असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती दिंडोरीचे आरएफओ सुशांत पाटील यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने वनपाल सुनील पवार यांना घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच नागरिकांशी चर्चा केली. पाहणीदरम्यान बिबट्याच्या ये-जा करण्याचे संकेत देणारे पावलांचे ठसे आढळल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

मोकळे प्लॉट, नदी आणि झाडाझुडपांमुळे धोका

सप्तशृंगी नगराला लागून मोकळे प्लॉट असून, जवळच नदी आणि काही ठिकाणी दाट झाडे-झुडपे आहेत. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी तसेच रात्रीच्या वेळी नागरी वस्तीत प्रवेश करण्यासाठी हा परिसर पोषक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रात्री नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

परिसरातील बिबट्याच्या हालचालींचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT