Thane Youth Looted
वणी : एका लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील तरुणाला वणी येथे बोलावून घेत निर्जनस्थळी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तरुणाकडील रोख रकमेसह मोबाईल फोन, बँक कार्डे आणि अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आल्याची फिर्याद आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली असून, अन्य पाच साथीदारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण (जि. ठाणे) येथील जेकब निक्लस फर्नांडिस (वय ३९) हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. त्यांचा शाळेतील जुना मित्र विजय आहेर याने एका लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फर्नांडिस हे रोख रकमेसह वणी येथे आले.
९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान आरोपींनी त्यांना वणी-फोफशी रस्त्यावरील एका निर्जनस्थळी नेले. तेथे विजय आहेर, संदीप शिंदे, प्रदीप गावीत आणि त्यांच्या अन्य पाच साथीदारांनी संगनमताने फर्नांडिस यांना चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी फर्नांडिस यांना नंबरप्लेट नसलेल्या पांढऱ्या तवेरा गाडीत जबरदस्तीने बसवले. गाडीतही त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
लुटलेल्या मुद्देमालामध्ये दोन लाख रुपयांची रोकड, एक लाख ५० हजार रुपये किमतीचा आयफोन १५ प्रो मॅक्स, ३५ हजार रुपये किमतीचा वनप्लस मोबाईल, विविध बँकांची आठ क्रेडिट कार्डे, चार डेबिट कार्डे आणि डेल कंपनीची लॅपटॉप बॅग यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर जेकब फर्नांडिस यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विजय आहेर, संदीप शिंदे आणि प्रदीप गावीत या तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य पाच आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून जुन्या मित्रालाच लुटल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.