नाशिक : अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपये लाच घेतल्याच्या आरोपावरून नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे व अतुल भुजंगराव क्षीरसागर यांच्यासह खासगी व्यक्ती रमेश गंभीरराव अहिरे व कल्पेश रमेश अहिरे या चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. एकाच वेळी दोन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी गंभीर प्रकरणात अडकल्याने शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करावी, म्हणून या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे यांच्यासाठी कल्पेश रमेश अहिरे (रा. शासकीय विश्रामगृह, नाशिक) यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत लाच घेतल्याचे मान्य केले.
मागणी केलेली लाचेची रक्कम शनिवारी (दि.१०) रात्री ११.१५ च्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या उपहारगृहामागील बाजूस तक्रारदार यांच्याकडून रमेश अहिरे यांनी उपनिरीक्षक दत्तात्रय गोडे व अतुल क्षीरसागर यांच्यासाठी स्वीकारली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार योगेश साळवे व दिनेश खैरनार यांनी भाग घेतला