नाशिक : नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या बांधकाम कारवाई विरोधात गत दहा दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांची मनधरणी करण्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना यश मिळाले आहे. मंत्री महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्थानिकांनी साखळी उपोषण तूर्त स्थगित केले आहे.
मंत्री महाजन हे सोमवारी (दि.3) जिल्हा दौऱ्यावर होते. सायंकाळी त्यांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्तालगतच्या कारवाई विरोधात संदीप फाऊंडेशन महाविद्यालयाजवळ बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी उपोषणकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. बुधवारी (दि. ५) मंत्री महाजन हे अधिकाऱ्यांसमवेत या रस्त्याची पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर अतिक्रमणाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नुकसान होणार नाही, अशी भूमिका घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सहापदरी रस्त्यासाठी आवश्यक असेल तेवढीच जागा घेण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांची जमीन जात असेल त्यांना भरपाई देण्यात येईल. अनावश्यक जागा घेतली जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बुधवारी (दि.5) 'एनएमआरडीए', सार्वजनिक बांधकाम विभाग, कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी या सर्वांसोबत या रस्त्याची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर या रस्त्याबाबत आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचे मंत्री महाजन यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. यानंतर, उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे जलेज शर्मा यांच्यासह कैलास खांडबहाले, ॲड.तानाजी जायभावे, डॉ.डी. एल. कराड, ॲड.प्रभाकर खराटे, भाऊसाहेब खांडबहाले, शिवाजी भावले, निवृत्ती लांबे आदी उपस्थित होते.