नाशिक : त्र्यंबकेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी आराखडे तयार करून तो इतर संबंधित विभागांना पाठवावा. या आराखड्याच्या धर्तीवर इतर विभागांनी सविस्तर स्थानिक नियोजन आराखडे तयार करत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आलेले आराखड्यांचे एकत्रीकरण करत त्यातुन निधी मागणीचे प्रस्ताव वेगळे करावेत. नियोजनात यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी सुविधांचा समावेश करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पौषवारी यात्राेत्सव १२ ते १५ जानेवारी या काळात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, आरोग्य सहसंचालक डॉ. योगेश चित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार, तहसीलदार गणेश जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील, मनपाचे कर अधिकारी संजय बैरागी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. धरमेश्वर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास, सहायक पोलिस निरीक्षक अश्विन निकम, ट्रस्टचे विश्वस्त नारायण मुठाळ, अध्यक्ष ॲड. घोटेकर उपस्थित होते.
जिल्हाधिकरी प्रसाद म्हणाले की, यात्रा कालावधीत कुशावर्त ते त्र्यंबकेश्वर मंदिर मार्गात होणारी गर्दी व वाहतूक नियोजनासाठी मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांनी समन्वयातून नियोजन करावे. मंदिरलगत परिसर फेरीवाला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करत नगरपरिषदेने दुकाने व स्टॉल्सची जागा निश्चित करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी सार्वजिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाने यात्रेसाठी येणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी हेलिपॅडची व्यवस्था करावी. ३० डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम आराखडा सादर करावा. पूर्वतयारी तर ८ ते १० जानेवारी दरम्यान सर्व विभागांनी स्थळभेट देत नियोजनानुसार कामे झाल्याची खात्री करावी. ११ जानेवारीस जिल्हा प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. यावेळी मंदिर संस्थानतर्फे करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.