नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी वावीहर्ष पाड्यावर राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुला-मुलींना जन्म दिला. त्यातील सहा मुलांची या महिलेनी विक्री केल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुलांची विक्री केली नसून, त्यांना दत्तक दिल्याचा दावा या महिलेने केला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी स्थापन केलेल्या 'चाइल्ड वेलफेअर कमिटी'चा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबविल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घटनेची शासन स्तरावर गंभीर दखल घेतली गेली. शासनाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण तसेच चाइल्ड वेल्फेअर कमिटी यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच चौकशी अहवाल पोलिसांंना सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी अहवाल ग्रामीण पोलिसांना सुपूर्द केला आहे. अहवालात, तीन बालकांची दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबविण्यात आल्याचे म्हटले आहे. 'मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा' (जुवेनाइल जस्टीस ॲक्ट) याप्रमाणे दत्तक प्रक्रिया राबविले गेली नसल्याने पोलिसांनी सखोल तपास करावा, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, अहवाल प्राप्त होताच, पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन्ही बालकांना बालगृहामध्ये ठेवले असून, दत्तक घेतलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
चाइल्ड वेलफेअर कमिटीचा अहवालन प्राप्त झाला असून, त्यात पोलिसांना सखोल तपासाबाबत सुचित केले आहे. त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करीत आहोत.बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक.