

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगावच्या वावीहर्ष पाड्यावरील आदिवासी पाड्यावरील आईने स्वतःची मुले विकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण गुन्हे शोध पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवत ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागातून दोन मुली आणि एक मुलगा अशा तीन बालकांना शोधून काढले. मुलांना विकणारे तसेच मुले विकत घेणारे दोन्ही कुटुंबे पोलिसांच्या ताब्यात आहे. नोटरी पद्धतीने विक्री केल्याचे धक्कादायक तथ्य उघड झाले आहे.
वावीहर्ष पाड्यावरील बच्चूबाई हंडोगे (४५) यांनी १४ मुलांना जन्म दिला आहे. दोनना गर्भपात तर एका मृत्यू झाल्याने सध्या ११ अपत्ये आहेत. आर्थिक संकट, उपचारांचा अभाव आणि सांभाळ होऊ न शकल्याने तिने सहा मुलांची विक्री केल्याचा संशय आहे. १० ऑक्टोबरला बाळाच्या तपासणीसाठी आशासेविका गेली असता बाळ आढळले नाही. आईच्या उत्तरामुळे संशय गडद झाला. पूर्वी दोन तीन वेळा तपासणी दरम्यान बालके गायब असल्याचेही नोंदले गेले होते.
आशासेविकेने वरिष्ठांना माहिती दिल्यानेच आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली. गरोदरपणात उपचार, पोषण आहार आणि शासकीय मदत न मिळाल्याने महिलेची परिस्थिती बिकट दिसली. बच्चूबाई आणि पती विष्णू हंडोगे यांनी बाळ नातेवाईकांना दत्तक दिल्याचे सांगितले. बाळ आजारी, दूध व औषधे नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. घोटी पोलिसांनी शहापूर, ठाणे आणि नाशिकच्या ग्रामीण भागात पथके पाठवत मुलांचा शोध घेतला. तीन मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले आहे. उर्वरित तीन मुले कुठे आहे याबद्दल उत्सुकता आहे.
मूल दत्तक देण्याची प्रक्रिया मोठी
एखाद्या महिलेला मुलं दत्तक द्यायचे असेल तर मोठी प्रक्रिया आहे. मूल दत्तक द्यायचेच होते तर नातेवाईकांशी चर्चा करायला हवी होती. मुले होऊ न देण्यासाठी ऑपरेशन गरजेचे होते. या महिलेने मुले विक्री केली. उद्या दुसऱ्या महिला देखील असेच करतील. त्यामुळे ही समाजाला काळिमा फासणारी घटना आहे.
ग्रामीण पोलिसांच्या यंत्रणेने रात्रभर शोध मोहीम राबवत आईने विक्री केलेली तीन मुले शोधली आहे. दोन्ही कुटुंब पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा सखोल शोध सुरू आहे.
बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेला चपराक
या घटनेने आरोग्य व्यवस्था, अंगणवाडी यंत्रणा तसेच आदिवासी भागातील मूलभूत सुविधा व्यवस्थेच्या अकार्यक्षमतेला चपराक बसली आहे. आदिवासी कुटुंबांच्या दारिद्र्यामुळे मुलांची विक्री होण्याइतकी बिकट वेळ येणे ही समाजासाठी लज्जास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया संघटना आणि स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.