Snakebite Awareness Campaign  Pudhari
नाशिक

Snakebite Awareness Campaign | आदिवासी विकास विभागाचा मोठा उपक्रम; नाशिकमधील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना सर्पदंश जनजागृतीचे धडे!

Snakebite Awareness Campaign | आदिवासी विकास विभागाचा उपक्रम: डिजिटल स्टुडिओतून ऑनलाइन संवाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी आदिवासी विकास विभागाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विभागाच्या वतीने दि. १९ ते २६ सप्टेंबरदरम्यान राज्यभरात 'सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान' राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत नाशिक अपर आयुक्त कार्यालय अधिनस्थ शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य आदर्श निवासी शाळा आणि वसतिगृहांमधील तब्बल सव्वादोन लाख विद्यार्थ्यांशी डिजिटल स्टुडिओद्वारे थेट संवाद साधण्यात आला. त्या माध्यमातून सर्पदंशाबाबत सजगतेचा आणि सुरक्षेचा जागर करण्यात आला.
सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानानिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमप्रसंगी अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त राजेंद्रकुमार हिवाळे, उपायुक्त नीलेश भा. अहिरे, स्वप्निल साबळे, ए.आर.ई.ए.एस. फाउंडेशनचे संचालक तथा सर्प व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर, अर्थ फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष सोनल कासलीवाल - दगडे, सर्प व वन्यजीव अभ्यासक राहुल नाईक, अनुपम सराफ, कार्यालयीन अधीक्षक अविनाश शिवरामे, सहायक प्रकल्प अधिकारी (प्र.) सुनील नेरकर, रामचंद्र तडवी, निंभा कापडणीस आदी उपस्थित होते.

सर्प अभ्यासक रणशूर यांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. सर्पदंशानंतर घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष पसरण्याची शक्यता वाढते; त्यामुळे रुग्णाला धीर देणे गरजेचे असते. प्राथमिक उपचार करून रुग्णाला तत्काळ व सुरक्षितपणे रुग्णालयापर्यंत दाखल करावे. स्थानिक पातळीवर केले जाणारे अघोरी व चुकीचे उपचार रुग्णाच्या जिवावर बेतू शकतात, असे सर्पअभ्यासक सुशांत रणशूर यांनी सांगितले.

चर्चासत्रातील प्रमुख मुद्दे

  • अन्नसाखळी व परिसंस्थेचे महत्त्व

  • विषारी व बिनविषारी सर्पांची ओळख

  • सर्पदंशानंतरचे प्रथमोपचार व प्रात्यक्षिक

  • अंधश्रद्धा व चुकीच्या उपचारांवर आघात

  • आश्रमशाळा परिसर स्वच्छतेवर भर

  • सर्पदंश प्रतिबंध - आवश्यक उपाययोजना

  • सुरक्षित वर्तन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद

  • वेळेवर वैद्यकीय उपचार

अपर आयुक्तांची प्रतिक्रिया "आश्रमशाळा व वसतिगृहांतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्पदंशाबाबत मनात असणारी भीती आणि गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहिती व योग्य प्रथमोपचाराचे धडे मिळणे गरजेचे होते. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून एकाच वेळी सव्वादोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. या अभियानामुळे आमचे विद्यार्थी स्वतःचे आणि आपल्या परिसराचे रक्षण करण्यासाठी अधिक सक्षम होतील."
— दिनकर पावरा, अपर आयुक्त, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT