नाशिक

Children Park Dispute | .. तरच ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कला मुदतवाढ द्या!

Children Park Dispute | ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कवरून निर्माण झालेला वाद शमता शमत नसल्याचे चित्र आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कवरून निर्माण झालेला वाद शमता शमत नसल्याचे चित्र आहे. महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी 'नाशिक फर्स्ट'च्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत या पार्कच्या कराराला मुदतवाढीची तयारी दर्शविल्यानंतर नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी नागरिकांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करूनच या संस्थेला मुदतवाढ देण्याची मागणी महापौरांकडे केली आहे.

नगरसेविका डॉ. पाटील यांनी यासंदर्भात महापौर आहेर आडके यांना निवेदन दिले आहे. कराराला मुदतवाढ द्यायची असेल, संबंधित संस्थेकडून महापालिका आकारण्यात येणारा दर, परिसरातील किमान पाच नागरिकांचे प्रतिनिधित्व, महापौरांचे पदसिद्ध अध्यक्षपद, जागेची मोजणी व लेआउटधारकांसाठी जॉगिंग ट्रॅक या परिसरातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करून मगच या संस्थेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडताना पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा उल्लेख निवेदनात केला आहे. ट्रॅफिक पार्कला जागा देताना परिसरातील लेआउटधारकांना त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बनवून देऊ, अशी हमी महापालिकेमार्फत दिली गेली होती. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जॉगिंग ट्रॅक नागरिकांना मिळालेला नाही.

परिसरातील नागरिकांना कधीही त्या जागेमध्ये प्रवेश प्रवेश मिळालेला नाही. आजपर्यंत कोणताही राजकीय किंवा परिसरातील लेआउटधारकांचा हस्तक्षेप या ठिकाणी झालेला नाही. महापालिकेमधील कोणतेही पदाधिकारी अथवा महापौर यांनी संस्थेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ आजपर्यंत केलेला नाही.

प्रकल्प या जागेमध्ये सुरू ठेवण्याबाबत परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधींची कोणतीही हरकत नाही. परंतु कराराला मुदतवाढ देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तयार केलेल्या नियमावलीचे पालन व्हावे. संस्थाचालकांची बैठक जशी घेतली, तशी स्थानिक नागरिकांचीही बैठक महापौरांनी घ्यावी, अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली आहे.

ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्कला मुदतवाढ देण्यास हरकत नाही. परंतु ती देताना आकारण्यात येणारा दर, परिसरातील किमान पाच नागरिकांचे प्रतिनिधित्व, महापौरांचे पदसिद्ध अध्यक्षपद, जागेची मोजणी व लेआउटधारकांसाठी जॉगिंग ट्रॅक या परिसरातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांचा विचार झाला पाहिजे.
- डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT