उपसरपंच file photo
नाशिक

Nashik - टोकडे ग्रामपंचायत उपसरपंच निवड बेकायदेशीरच!

गटविकास अधिकाऱ्यांचा अहवाल; सरपंचांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीत दि. ८ ऑक्टोबर रोजी झालेली उपसरपंच निवड बेकायदेशीर असल्याचा अहवाल गटविकास अधिकारी सतीश धस यांनी दिला. पंचायत समितीने हा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याकडे पाठविला असून, ही माहिती तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांनी दिली.

उपसरपंच निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच दि. ३० सप्टेंबर रोजी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सत्ताधारी गटाच्या तीन सदस्यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर दि. १ ऑक्टोबर रोजी आयोजित सभा आवश्यक संख्याबळाअभावी तहकूब करण्यात आली होती. मात्र, दि. ८ ऑक्टोबर रोजी उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आल्याने या प्रक्रियेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, विरोधी गटातील तीन सदस्यांनी राजीनामे दिले होते.

या राजीनाम्यांवर नियमानुसार निर्णय झाला होता का, त्यांची कायदेशीर स्थिती काय होती आणि आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे संख्याबळ आणि सदस्यांची कायदेशीर स्थिती स्पष्ट नसताना, दि. ८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेली विशेष सभा बेकायदेशीर असल्याचे गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद आहे.

ग्रामपंचायत अधिकारी किरण काकिपुरे यांनी दि. १२ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालेगाव यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात, सरपंच शालिग्राम श्रावण साळुंके यांनी दि. ८ ऑक्टोबर रोजी सभा घेण्यास दबाव आणल्याचा उल्लेख आहे. तसेच, उपसरपंच निवड प्रक्रियेबाबतची हरकत कार्यवाही पुस्तकात नोंदविल्याचेही स्पष्ट केले आहे.

सरपंचांच्या चौकशीची मागणी

ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी यांच्या चौकशी अहवालांच्या आधारे गटविकास अधिकारी सतीश धस यांनी पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला. ग्रामसेवकाची हरकत डावलून निवड प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोप तक्रारदार द्यानद्यान यांनी केला आहे. या प्रकरणात सरपंच शालिग्राम साळुंके यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT