नाशिक, जिजा दवंडे
सध्या नाशिक जिल्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान खंडपीठाच्या अधिकारक्षेत्रात येतो. वरवर पाहता ही केवळ प्रशासकीय रचना वाटते, पण प्रत्यक्षात तिचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील सामान्य नागरिक, शेतकरी, वकील आणि शासकीय अधिकारी यांना रोज बसत आहे.
न्यायासाठी मुंबई गाठणे अनेकांसाठी जिकिरीचे ठरते. लांबचा आणि खर्चिक प्रवास, मुंबईतील प्रचंड गर्दी, वाढलेली वकील फी, मुक्कामासाठी लागणारा अतिरिक्त खर्च आणि तरीही प्रलंबित खटल्यांमुळे महिनोन्महिने सुनावणीची वाट पाहावी लागते. विशेष म्हणजे नाशिक विभागातील धुळे, जळगाव आणि नंदुरबार, नगर हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाशी जोडलेले असताना, केवळ नाशिक जिल्हा मुंबईशी जोडला गेल्याने प्रशासकीय पातळीवरही अडचणी वाढल्या आहेत. या परिस्थितीत नाशिककरांसाठी उच्च न्यायालयातून न्याय मिळविणे कठीण झाले आहे. म्हणूनच नाशिक जिल्ह्याला जवळच्या, परवडणाऱ्या आणि सोयीच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाशी जोडणे ही रास्त मागणी पुढे आली आहे. ही मागणी सर्वसामान्य जनतेच्या न्यायाच्या हक्काची आहे. याच आवाजाला बळ देण्यासाठी 'नाशिकला हवा न्याय' ही विशेष वृत्तमालिका सुरू करीत आहोत.
नाशिक जिल्ह्यातील नागरिक आणि वकील मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान खंडपीठात न्यायालयीन सुनावणीसाठी दरवर्षी अनेक वेळा प्रवास करतात. सुमारे 180 किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी वाहतूक कोंडी, महामार्गावरील गर्दी आणि शहरातील अवजड वाहतूक यामुळे सरासरी ५ ते ६ तासांचा अवधी लागतो. परिणामी, अनेकदा सकाळी निघूनही दुपारनंतरच न्यायालय परिसरात कसेबसे पोहोचता येते.
या अडचणींमुळेच नाशिक जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाला जोडला जावा अशी मागणी वाढली आहे. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर सुमारे 200 किलोमीटर असून, समृद्धी महामार्गामुळे तो प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांवर आला आहे. रेल्वेनेही दररोज अनेक गाड्या उपलब्ध असल्यामुळे लोकांना जलद, स्वस्त आणि सुलभ पर्याय उपलब्ध होत आहेत
प्रवास वेळेची तुलना
नाशिक ते मुंबई - 180 किमी सरासरी प्रवास, 5–6 तासांचा वेळ - शहरातील महामार्ग हाच पर्याय
नाशिक ते संभाजीनगर - 200 किमी सरासरी प्रवास, 2–2.5 तासांचा वेळ, समृद्धी महामार्ग हा पर्याय
मुंबईला पोहोचण्यासाठी अडथळ्याची शर्यत
महाराष्ट्राचे सर्वाधिक गर्दीचे रस्ते मुंबईकडे जातात. या मार्गावर रोज हजारो वाहनांची गर्दी होते, त्यामुळे पक्षकाराला प्रकरणांच्या वेळेनुसार सुनावणीसाठी जाणे कठीण होते. या उलट समृद्धी महामार्गाचा दर्जा पाहता 4 - 6 लेनचा उच्च वेगाचा मार्ग म्हणून हा महामार्ग विकसित झाला आहे. त्यामुळे वेळेची बचत आणि प्रवासाचा कलावधी अवघ्या दोन ते अडीच तासांवर आला आहे. या शिवाय छत्रपती संभाजीनगरला रेल्वे कनेक्टिव्हिटीही अत्यंत चांगली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रवास अधिक सोयीचा होतो.
न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात पोहोचणे पक्षकार, वकील, प्रशासकीय बाबींसह अर्थिक, वेळेचा अपव्यय अशा सर्वच दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांमुळे होणारा विलंब न्याय नाकारण्यासारखा ठरत आहे. यावर नाशिक जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला जोडणे हाच एकमेव पर्याय आहे.ॲड. जयदीप वैशंपायन, नाशिक
मुंबई उच्च न्यायालयाला जोडलेला परिसर व्यापक आहे. त्यामुळे तेथील प्रलंबित प्रकरणांची संख्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठापेक्षा निश्चितच अधिक आहे. यातूनच अपील किंवा बेल पेटिशन दाखल केल्यानंतर माहिनोन्महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे पीडिताला न्याय मिळणे दुरापास्त होते. जर नाशिक जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला जोडला, तर नक्कीच पक्षकारांना कमी वेळेत न्याय मिळणे शक्य होईल.ॲड. राजेश आव्हाड, नाशिक
नाशिकला काही दिवसांपूर्वीच सुमारे 310 कोटींची अत्याधुनिक न्यायालय इमारत उभारली आहे, तर जवळपास 45 काेटी रुपये खर्च करून बहुमजली पार्किंग उभारले जात आहे. एका बाजूला उच्च न्यायालयासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असताना न्यायासाठी नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईत जावे लागते. नाशिक जिल्हा संभाजीनगरला जोडला तर पक्षकारांना उपयोग हाेईल.ॲड. अरुण दोंदे, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य पक्षकारांसह ग्रामीण शेतकऱ्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयात न्याय मागणे अडचणीचे ठरत आहे. मुंबईतील वकिलांची फी, तिथे जाणे-येणे, प्रवास, प्रलंबित प्रकरणांचा डोंगर त्यामुळे वाट पाहण्याखेरीच हातात काहीच राहात नाही. या उलट छत्रपती संभाजीनगर खंडपीठ नाशिकसाठी सर्वच दृष्टीने सोयीचे आहे. ग्रामीण भागातील जनतेला संभाजीनगर अधिक सोयीचे आहे.ॲड. मनोज आंबाडे, नाशिक
नाशिक जिल्ह्याची भौगोलिक व्याप्ती पाहता, छत्रपती संभाजीनगर अधिक सोयीचे आहे परंतु तत्कालीन परिस्थितीत ते मुंबईशी जोडले गेले होते. आता परिस्थिती बदलली आहे. समृद्धी महामार्गामुळे छत्रपती संभाजीनगरला अवघ्या अडीच तासांत पोहोचता येते. शिवाय इरतही सर्वच बाबतीत परवडणारे आहे.ॲड. सचिन साळवे, नांदगाव