पंचवटी (नाशिक) : तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधातील आंदोलनास पाठींबा देण्यासाठी किन्नर समाजही उतरला असून, त्यांनी सोमवारी (दि. ८) तपोवनात वृक्षांभोवती साखळी धरली. प्रशासनाने वृक्षतोड निर्णय मागे घेतला नाही तर महापालिकेसमोर समोर टाळी बजाव आंदोलन छेडत कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन व मनपा अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला.
मानवता किन्नर समाजाच्या पदाधिकारी व सदस्यांनी पाठिंबा देत वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. यावेळी 'तपोवन वाचवा, नाशिक वाचवा', 'तपोवन आमच्या हक्काचे', 'भ्रष्टाचार थांबला पाहिजे', 'लाकूड तोडयाचे करायचे काय खाली डोके वर पाय' अशा घोषणा देत प्रशासन व शासनाचा निषेध केला. आंदोलनात मानवता किन्नर समाज अध्यक्ष सलमा गुरू, मंजू, सारिका, सोनाली, श्री ताई, सिमरण, कशीष, रविना, आकांक्षा, जानव्ही, सोनिया पुजारी आदिंसह मानवता किन्नर समाज सदस्य सहभागी झाले होते.
वारकऱ्यांचेही आंदोलन
वारकरी संप्रदायाचे काही वारकऱ्यांनी तपोवनात येऊन भजन गायन करीत वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनास पाठींबा दिला. तसेच शहरातील काही शाळांचे विद्यार्थ्यांनाही तपोवनात येऊन निदर्शने केली.