Nashik Talathi Strike Revenue AI Image
नाशिक

Nashik Talathi Strike Revenue | नाशिकमध्ये महसूल यंत्रणा ठप्प! 721 तलाठी अन् 121 मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर

Nashik Talathi Strike Revenue | प्रांत पवन दत्ता यांच्या बदलीच्या मागणीवर महासंघ ठाम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी महसूल विभागातील सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांवर केलेल्या निलंबन व वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी बुधवार (दि. १६) पासून सामूहिक रजा घेत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. फेरफार नोंदींसह विविध महसुली कामे ठप्प झाली आहेत.

तलाठी महासंघाने प्रांताधिकारी दत्ता यांची बदली करावी, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी, या मागणीवर ठाम भूमिका घेतली आहे. इगतपुरी तालुक्यातील फेरफार नोंदींत अनियमितता आढळल्याच्या कारणावरून प्रांताधिकारी पवन दत्ता यांनी पाच तलाठी आणि एका मंडळ अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई केली होती. याशिवाय वेतनवाढीबाबतही कारवाई करण्यात आल्याने महसूल विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत.

संबंधित कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप तलाठी महासंघाने केला आहे. या पार्श्वभूमीवर तलाठी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळी प्रांताधिकारी पवन दत्ता यांची बदली करावी, त्यांच्या कामकाजाची चौकशी करावी आणि निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

प्रशासनाच्या पातळीवर चर्चेचे प्रयत्न झाले. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने महासंघाने बुधवारपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ७२१ तलाठी आणि १२१ मंडळ अधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा तलाठी महासंघाने केला आहे. त्यामुळे गावपातळीपासून तालुका आणि जिल्हा पातळीपर्यंत महसूल यंत्रणेतील कामकाज विस्कळीत झाले आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी दत्ता यांच्याकडून करण्यात आलेली कारवाई नियमबाह्य असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला असला, तरी प्रशासनाची बाजू या प्रकरणात अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. संबंधित फेरफार नोंदींत नेमक्या कोणत्या प्रकारच्या अनियमितता आढळल्या आणि त्याआधारे करण्यात आलेल्या कारवाईचे स्वरूप काय आहे, याबाबत प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

फेराफार नोंदींवर परिणाम

तलाठी हे गावपातळीवरील महसूल प्रशासनातील महत्त्वाचे घटक असल्याने त्यांच्या कामबंद आंदोलनाचा थेट परिणाम नागरिकांच्या महसुली कामांवर होत आहे. जमीन खरेदी-विक्री, वारस नोंद, फेरफार नोंदी, सातबारा उतारे, विविध दाखले, पीक पाहणी तसेच अन्य महसुली कामांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. मात्र, तलाठी सामूहिक रजेवर गेल्याने या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कारवाईच्या पद्धतीवर आक्षेप

फेरफार नोंदींमधील अनियमिततेसंदर्भात प्रशासनाला कारवाई करण्याचा अधिकार असला तरी, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना नियम व नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन झाले पाहिजे, अशी भूमिका तलाठी महासंघाने घेतली आहे. प्रांताधिकारी दत्ता यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचा महासंघाचा दावा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT