नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंदिरानगरच्या राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थेला डीपी रोडसाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदल्यात मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या टीडीआर व्यवहारातील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, समितीला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सभापती सानप यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. १६) पार पडली. यात सदस्य किरण दराडे यांनी राजसारथी सोसायटीच्या टीडीआर व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.
त्यांनी याबाबत चौकशीची मागणी केली. राजसारथी गृहनिर्माण संस्थेच्या जागेतून डीपी रस्ता गेला असून, त्यासाठी महापालिकेने ८२११ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले आहे. या भूसंपादनाच्या मोबदल्यात संस्थेला १६ हजार ४२२ चौरस मीटर टीडीआर मंजूर केला आहे.
या टीडीआर विक्रीतून संस्थेला १२ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, संस्थेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी टीडीआरची परस्परविक्री केल्याचे आरोप झाल्याने हे प्रकरण दोन वर्षांपासून चर्चेत आहे.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरुत, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. समितीने दोन आठवड्यांत चौकशी पूर्ण करत समितीकडे अहवाल सादर करावा, असे आदेश सभापती सानप यांनी दिले आहेत.
राजसारथी सोसायटीच्या टीडीआर गैरव्यवहारावर चर्चा सुरू असताना सदस्य किरण दराडे यांनी या प्रकरणातील एका माजी नगरसेवकाने जलसंपदामंत्री महाजन यांचे नाव पुढे करत चौकशी होणार नसल्याचा दावा केल्याचा आरोप सभागृहात केला.
"महाजनांच्या नावाखाली लूट सुरू आहे, ती थांबली पाहिजे", असा उल्लेखही त्यांनी केला. दराडे यांच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांसह स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांनी आक्षेप घेतला.
कोणत्याही मंत्र्याचे किंवा व्यक्तीचे नाव पुराव्याशिवाय सभागृहात घेऊ नये, अशी तंबी सानप यांनी दिली. संबंधित आमदार किंवा कार्यकर्त्याचे नाव स्पष्टपणे सांगण्याचे आव्हानही त्यांनी केले. मात्र, दराडे यांनी आपले वक्तव्य मागे घेण्यास नकार देत टीडीआर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी कायम ठेवली. यानंतर काही काळ सभापती सानप आणि दराडे यांच्यात शाब्दिक वाद झाला.