नाशिकरोड: दक्षिण भारतातील प्रमुख व पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन एका यात्रेत घडवून आणण्यासाठी आयआरसीटीसीने “टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण” या नव्या आध्यात्मिक पर्यटन दर्शनाची घोषणा केली आहे. ही विशेष रेल्वे यात्रा १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मनमाड येथून निघणार असून भाविकांना श्रद्धा, संस्कृती आणि वारसा यांचा सुरेख संगम अनुभवता येणार आहे.
ही यात्रा १२ रात्री व १३ दिवसांची आध्यात्मिक सहल महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील भाविकांसाठी खास संधी ठरणार आहे. या यात्रेदरम्यान दक्षिण भारतातील प्रसिद्ध धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी मनमाड, नाशिकरोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवरून रेल्वेत चढण्याची व उतरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले की, या विशेष रेल्वे यात्रेमुळे दक्षिण भारतातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक मंदिरांचे दर्शन एकाच पॅकेजमध्ये शक्य होणार आहे.
दरम्यान, आयआरसीटीसी पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी स्पष्ट केले की, प्रवाशांच्या आरोग्य, सुरक्षितता व सोयीसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून प्रवासादरम्यान दर्जेदार सुविधा पुरविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक भाविकांनी आयआरसीटीसीशी संपर्क साधावा किंवा bgtmumbai@irctc.com या ई-मेलवर माहिती मागवावी, असे आवाहन केले आहे.