Nashik Pneumonia Campaign  Pudhari
नाशिक

Nashik Pneumonia Campaign | बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात विशेष अभियानाला सुरुवात

Nashik Pneumonia Campaign | जनजागृतीसह प्रतिबंधक आणि आरोग्यविषयक उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करून या आजारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात विशेष अभियान हाती घेतले आहे. 'एसएएनएनएस' (न्यूमोनिया प्रतिबंधासाठी सामाजिक जनजागृती आणि कृती) असे या अभियानाचे नाव असून, जागतिक न्यूमोनिया दिनाचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरात याचा प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य संस्था आणि ग्रामस्तरावर विविध उपक्रमांना सुरुवात झाली असून, फेब्रुवारी २०२७ अखेपर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे.

बालकांमधील न्यूमोनियाची लक्षणे वेळेत ओळखणे, आजाराचे योग्य निदान करणे आणि तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी बालकांचे संरक्षण, आजाराला प्रतिबंध आणि वेळेत उपचार या तीन मार्गांवर विशेष भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू प्रति हजार जीवित जन्मामागे तीनपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नवजात बालकाला जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ आईचे दूध देणे आणि त्यानंतर वयानुसार पूरक आहार सुरू करणे याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

नियमित लसीकरण, जीवनसत्त्व 'अ'ची मात्रा, हातांची स्वच्छता तसेच घरणातील हवा स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. स्वयंपाकघरतील धूर, धूळ आणि वायुप्रदूपासून बालकांना दूर ठेवण्याबाबतही जनजागृती केली जाणार आहे. न्यूमोनियापासून संरक्षणासाठी बालकांचे न्यूमोकॉकल लसीकरण पूर्ण करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. न्यूमोनियाची लक्षणे ओळखणे, आजाराची तीव्रता निश्चित करणे, आवश्यक उपचार सुरू करणे आणि गंभीर बालकांना पुढील उपचारांसाठी तातडीने संदर्भीत करणे याबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
पथनाट्यातून प्रबोधन

ग्रामीण आणि शहरी भागात गृहभेटी, माता बैठका, ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण दिनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय पोस्टर्स, माहितीपत्रके, ध्वनिचित्रफिती, समाजमाध्यमे, ध्वनिषपेक आणि पथनाट्यांच्या माध्यमातून न्यूमोनियाची लक्षणे, प्रतिबंधक उपाय आणि उपचारांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

'न्यूमोनिया नाही तर बालपण सही!' या घोषणाखाली राबवण्यात येणाऱ्या अभियानात पालक, कुटुंबीय, ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.
- डॉ. राजेंद्र बागूळ, जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT