Nashik Accident News : कार अपघातात सहा ठार, एक गंभीर  File Photo
नाशिक

Nashik Accident News : कार अपघातात सहा ठार, एक गंभीर

कळवणजवळ घटना; मृतांमध्ये देवळा, नामपूर येथील प्रवासी

पुढारी वृत्तसेवा

Nashik Six killed, one seriously injured in car accident

कळवण : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे बुधवारी (दि. ४) रात्री भरधाव कार घराच्या बीमवर आदळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये नामपूर व देवळा येथील महिला, बालक व चालकाचा समावेश आहे. एकाचा मृत्यू उपचारासाठी नेत असताना झाला, तर एकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील मानूर शिवारातील कोल्हापूर फाटा येथे बुधवारी रात्री १०.१५ च्या सुमारास नाशिकहून कळवणकडे जात असलेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली. धडक एवढी जोरदार होती की, कारच्या समोरील बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला, तर एका जखमीवर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत हे सटाणा तालुक्यातील नामपूर व देवळा येथील आहेत. भालचंद्र मधुकर वधान (६५) गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली असून, पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जगदीश बोरसे अधिक तपास करीत आहेत.

मायलेकरांचा एकाच वेळी अंत्यविधी

देवळा येथे माधवी योगेश मेतकर (३२), उत्कर्ष योगेश मेतकर व तृष्णा योगेश मेतकर या तिघा मायलेकरांवर गुरुवारी (दि. ५) दुपारी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हार्डवेअर व्यावसायिक वसंत मेतकर यांचा योगेश हा कर्ता मुलगा होलसेल मार्केटिंगमध्ये, तर सून माधवी या 'बँक ऑफ बडोदा मध्ये बँकमित्र म्हणून कार्यरत होत्या. दोघांना उत्कर्ष (८) आणि तृष्णा (४) अशी दोन लेकरे होती. गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी येथे शिकायला असलेला उत्कर्ष उन्हाळी सुटीमुळे घरी आलेला होता. यदवाखाना, लग्न व भावाला भेटण्यानिमित्त माधवी या बुधवारी आपल्या मुलांना घेऊन नाशिकला गेल्या होत्या. रात्री माधवी यांचे नामपूरचे काका व काकूंसोबत त्यांच्या कारमधून त्यांनी आई-मुलांसमवेत परतीचा प्रवास केला. मात्र, तो नांदूरी-कळवण दरम्यानच्या कोल्हापूर फाट्याच्या वळणावर अपघाताने अर्ध्यावरच संपला.. मायलेकींना एकत्र, तर मुलाला स्वतंत्र अग्निडाग दिला.

मृतांची नावे अशी

माधवी योगेश मेतकर (३०), त्रिशा योगेश मेतकर (३), उत्कर्ष योगेश मेतकर, शैला वसंत बधान (६५), प्रतीक्षा भालचंद्र बधान (५०), कारचालक सगीरखा मेहबूबखा पठाण (६७)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT