मालेगाव : शहरात सध्या जन्म दाखल्यावरून विशेष पथकाचा तपास सुरू आहे. दि. 1 मार्चपासून मुस्लीम बांधवांच्या रमजान सणाला सुरुवात होत आहे. या काळात पथकाचा सुरू असलेला तपास स्थगित करण्यात यावा, अशी मागणी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने एसआयटीचे सदस्य सचिव तथा अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कमिटीचे समन्वयक व माजी आमदार आसिफ शेख व मुस्तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली कमिटीने बुधवारी (दि.19) या मागणीचे निवेदन दिले. येत्या 1 मार्चपासून मुस्लीम बांधवांच्या रमजान महिन्यास सुरुवात होत आहे. या महिन्यात चौकशीसाठी येणे कठीण होईल. तसेच तपासी पथकाचे कार्यालय कॅम्प भागात आहे.
त्यामुळे या प्रकरणातील महिला अर्जदारांची तपासणी 1 मार्चपूर्वी करावी किंवा 3 एप्रिलपर्यंत तपास स्थगित करण्यात यावा. तसेच शक्य नसल्यास एसआयटीचे कार्यालय शहर पोलिस ठाणे आवारात हलवावे आणि सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत तपासणी करावी. या गुन्ह्यात काही नागरिकांवर जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने छावणी पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 338 लावण्यात आले आहे. हे कलम कमी करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी साबीर गौहर, शकील जानी बेग, असलम अन्सारी आदींसह मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.