

नाशिक : बांगलादेशी, रोहिंग्या नागरिकांना मालेगाव येथून बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याच्या आरोप झाल्याने राज्य शासनाने या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. या चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गत वर्षी मालेगाव येथील वोट जिहाद, नामको बँकेत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा भांडाफोड केल्याने मालेगाव शहर चर्चेत आले. त्यामुळे राज्यस्तरावर या विषयांची चर्चा झाली आणि विविध तपास यंत्रणांकडून या आरोपांची चौकशीही केली जात आहे. त्यानंतर आता मालेगाव शहरात एका महिन्यात सर्वाधिक जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. जन्मदाखले वितरीत केलेल्या काही व्यक्तींचे पत्तेही नसल्याची बाब उघड करून त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने याची दखल घेत विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. ही समिती या बनावट जन्मदाखल्यांबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करून आपला अहवाल देणार आहे. मालेगाव प्रमाणेच अमरावती येथील आरोपांची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
विशेष चौकशी पथकाचे अध्यक्ष म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असून मालेगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हे सचिव राहतील. तर समिती सदस्य म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरविकास शाखेचे विभागीय सहआयुक्त व नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.