सिन्नर (नाशिक) : मातोश्री निर्मला गोपाळ कुलकर्णी विद्या मंदिराच्या विद्यार्थिनी तेजस्विनी पुरुषोत्तम सोळंके व तन्वी विश्वास रसाळ यांनी दिल्ली ते मुंबई हे १५०० किलोमीटरचे अंतर अवघ्या १४ दिवस १५ तासांत धावत पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
या अभूतपूर्व यशामुळे त्यांनी जगातील सर्वात कमी वयाच्या धावपटू म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. कठोर शारीरिक तयारी, मानसिक बळ आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तेजस्विनी व तन्वी यांनी हा दीर्घ पल्ल्याचा धावण्याचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला.
या प्रवासादरम्यान विविध भौगोलिक व हवामानातील आव्हाने त्यांनी जिद्दीने पेलत महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रात नवा मानाचा तुरा रोवला. त्यांना प्रशिक्षक अभिजीत भालेराव, डॉ. तुषार बोरकर, डायट प्लॅनर सिद्धार्थ जाधव, सोशल मीडिया ऑपरेटर विश्वास रसाळ व पुरुषोत्तम सोळंके तसेच जालिंदर घोरपडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तेजस्विनी व तन्वी यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला असून, दोन्ही धावपटूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रीडाक्षेत्रात नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी ही कामगिरी सिन्नरच्या नावाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारी ठरली आहे.