सिन्नर (नाशिक) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून तालुक्यातील गुळवंच येथील ज्येष्ठ नागरिक तान्हाबाई गणपत कोळाजी कांगणे (84) यांनी अंगणवाडी स्तरावर डिजिटल शिक्षणाला चालना देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
ग्रामीण भागातील लहान बालकांना आधुनिक व डिजिटल शिक्षणाची संधी मिळावी, या सामाजिक भावनेतून कांगणे यांनी स्वखर्चाने तब्बल 44 हजार रुपये किमतीचे 32 इंची 6 एलईडी रंगीत टीव्ही 6 अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेत. या उपक्रमाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे. या टीव्ही संचांचे अनावरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच भाऊदास शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्य संतोष कांगणे, तानुबाई कांगणे, ग्रामपंचायत अधिकारी संजय गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका - मदतनीस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान
वाढत्या वयातही समाजाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले हे योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तान्हाबाई कांगणे या खर्या अर्थाने डिजिटल आजी म्हणून ओळखल्या जात आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.