नाशिक : शहराच्या सर्वच भागांत सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सुरू असून, या कामांमधील अनियमिततेचा फटका नाशिककरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. कामांचा दर्जा दिसाळ असून, यावर भाजप नगरसेवकांनीच आक्षेप घेत, नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते. आता भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनीही कामांमधील अनियमिततेचा बॉम्ब फोडल्यामुळे नगरसेवकांच्या आरोपांना बळकटी मिळाली आहे.
पाणी, रस्ते, गटार, रिंगरोड, वीज या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा गंभीर आरोप केदार यांनी केला आहे. त्यामुळे सिंहस्थ कामांवरून आत्ता कुंभमेळामंत्री गिरीश महाजन विरुद्ध नगरसेवक अन् शहराध्यक्ष असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या सिंहस्थ कामांवरून भाजप नगरसेवक विरुद्ध ठेकेदार असा संघर्ष बघावयास मिळत आहे. गेल्या आठवड्यात नगरसेवकांनी ठेकेदारांच्या माणसांना चोप दिल्याचा आरोप ठेकेदारांनी थेट महापालिका आयुक्तांकडे केला होता. तसेच पोलिस आयुक्तांकडे याबाबतची तक्रारही दिली होती. त्यानंतर नगरसेवकांसह काही झेरॉक्स नगरसेवकांना पोलिस आयुक्तांच्या 'कायद्याच्या बालेकिल्ल्यात' सफर घडवून आणली होती. त्यामुळे अधिकच विधरलेल्या नगरसेवकांनी महासभेत पाणीप्रश्नांवरून ठेकेदारांना जाब विचारणे गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत, महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. महापौरांनीदेखील घटनेचा निषेध करीत, प्रशासनाला दम भरला होता.
हा अध्याय येथेच संपेल असे वाटत असतानाच, शहराध्यक्ष केदार यांनी पुन्हा वादाला फोडणी दिली आहे. गुरुवारी (दि. २३) त्यांनी प्रसिद्धिपत्रक काढत, सिंहस्थाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करीत पक्षाला अन् सरकारला घरचा आहेर दिला आहे. सध्या वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनलवर नगरसेवकांबाबत उलटसुलट व चुकीच्या बातम्या येत असल्याने चुकीचा संदेश जात आहे.
जर ४० हजार मतदारांच्या प्रभागामधून नगरसेवक निवडून येत असतील, तर त्यांनाही त्यांच्या प्रभागात मतदार जाब विचारणारच असल्याचे पत्रात नमूद करीत, त्यांनी नगरसेवकांच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता असून, भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुंभमेलामंत्री महाजन यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
.. तर ठेकेदारांना काळ्या यादीत टाका
सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात, परिसरात सुरू असलेल्या विकासकामांवर लक्ष देऊन नागरिकांच्या तक्रारी सोडवाव्यात, ठेकेदारांनी कामे करताना तत्परतेने, दर्जेदार तसेच दिलेल्या मुदतीत केली पाहिजेत. ते तसे करत नसतील, तर आयुक्तांकडे नगरसेवकांनी तक्रारी कराव्यात तसेच आयुक्तांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही शहराध्यक्ष केदार यांनी पत्रकात केली आहे.
महाजनांनाच थेट आव्हान
ठेकेदारांनी पराचा कावळा न करण्याचा सल्ला देतानाच, ठेकेदारांकडून नगरसेवकांना बदनाम करण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांनासुद्धा आयुक्त आणि प्रशासनाने पाठीशी घालू नये. सध्या ज्या बातम्या समोर येत आहेत, त्यावरूम नगरसेवकांभोवती संशयाचे वातावरण तयार होत आहे. नगरसेवकांनाही त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव आहे. मनपा आयुक्तांनी याबाबत पूर्ण शहानिशा केल्याशिवाय नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नये, असेही केदार यांनी म्हटले. दरम्यान, केदार यांनी सिंहस्थ कामांवरून प्रश्न उपस्थित करून थेट कुंभमेळामंत्री महाजनांनाच आव्हान दिल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे.