Nashik Simhastha Kumbh Mela: Simhastha works will be filmed
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कामांमधील पारदर्शकता, वेग आणि गुणवत्ता राखण्यासाठी या कामांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे निर्देश सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. सर्व कामांचे चार टप्प्यांत चित्रीकरण करून प्राधिकरणाला सादर करण्याच्या सूचना डॉ. गेडाम यांनी दिल्याने या कामांमधील गैरप्रकारालाही चाप बसणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येत्या २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंत व भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नाशिक महापालिकेने १५ हजार कोटी, तर अन्य शासकीय विभागांनी ९ हजार कोटी असा २४ हजार कोटींचा आराखडा शासनाला सादर केला आहे. परंतु, शासनाकडून या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. विधिमंडळ अधिवेशन काळात राज्य सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये एक हजार कोटींचा निधी सिंहस्थ कामांसाठी मंजूर केला आहे. या निधीच्या आधारे सिंहस्थ प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात ५१४० कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून, त्यातील ३०५६ कोटींच्या कामांना तत्काळ सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
सिंहस्थ कामे गुणत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांमध्ये पारदर्शकता, वेग आणि गुणवत्ता राखण्यासाठी डॉ. गेडाम यांनी या सर्व कामांचे टप्प्याटप्प्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच जीओ फोटो काढून ठेवण्याचे निर्देश डॉ. गेडाम यांनी दिले आहेत. त्यामुळे सिंहस्थ कामांमधील भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
सिंहस्थ कामांमध्ये अधिकारी व ठेकेदारांची रिंग सध्या चर्चेत आहे. यामुळे कामांचा दर्जा राखला जाणे आव्हानात्मक बनले आहे. नाशिक महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांकडून रिंग करून कामे मिळवली जात आहेत. काही आमदारही यात सहभागी असल्याची चर्चा आहे. डॉ. गेडाम यांनी सिंहस्थ कामांचे व्हिडिओ चित्रीकरण आणि जीओ फोटोचा निर्णय घेतल्याने या कामांमधील रिंगलाही आळा बसणार आहे.
चित्रीकरणासाठी मोबाइल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा तसेच ड्रोनचा वापर करावा.
संपूर्ण कामाच्या जागेचा व्हिडिओ चित्रीकरण आणि जीओ टॅग, टाइम स्पॅम्पसह फोटो काढावा.
एक चौरस मीटरसुद्धा जागा व्हिडिओ चित्रीकरणातून सुटता कामा नये.
कामाचे २५, ५० आणि ७५ टक्केनुसार व्हिडिओ काढावा, तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही चित्रीकरण करावे.
रस्त्यांवर डांबर टाकत असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण आणि जीओ फोटो आवश्यक,
सिंहस्थ साहित्य खरेदी, कार्यक्रम यांचेदेखील व्हिडिओ चित्रीकरण व फोटो आवश्यक.
सदर व्हिडिओ, फोटो हे जतन करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमला अपलोड करावेत.