Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ तयारीत कुंभनगरीला 'शेजारधर्मा'ची साथ!

Nashik Simhastha Kumbh Mela | शेजारी जिल्ह्यांच्या विकासालाही नवदिशा : रस्ते, रेल्वे, पर्यटन व सुविधांच्या कामांना वेग

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नामदेव भोर

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याबरोबरच शेजारील जिल्ह्यांमध्येही विकासकामांना चालना मिळत आहे. सुमारे १२ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता लक्षात घेऊन, कुंभनगरीबरोबरच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रस्ते, रेल्वे, पर्यटन आणि वाहतूक साखळी सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकसह शेजारील जिल्ह्यांच्या विकासालाही नवी दिशा मिळत आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वयातून रिंग रोड, रामकाल पथ, गोदावरी घाटांचे सुशोभीकरण, पूल, साधुग्राम, रस्ते रुंदीकरण, स्मार्ट कमांड सेंटर, सीसीटीव्ही आणि दूरसंचार सुविधांची कामे सुरू आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त परिसराचा विकास, रस्ते, पार्किंग, जलव्यवस्था आणि भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.

त्याचप्रमाणे नाशिक - त्र्यंबकेश्वरसह शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांतील धार्मिक व पर्यटनस्थळांना रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीने जोडण्याच्या दृष्टीनेही पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. कुंभमेळ्यानंतरही या सुविधांचा पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला लाभ होणार असल्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त दीर्घकालीन विकासाची संधी निर्माण झाली आहे.

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन केवळ शहरापुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण प्रादेशिक पातळीवर करण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात दि. ९ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेत शेजारील जिल्ह्यांसह गुजरातमधील वलसाड व डांग जिल्ह्यांतील अधिकारी आणि विविध संबंधित यंत्रणांकडून त्यांच्या कार्य क्षेत्रातील तयारीची सविस्तर माहितीही मागवण्यात आली आहे.

अहिल्यानगर: धार्मिक, पर्यटन साखळीतील महत्त्वाचा दुवा

शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक स्थळ असल्यामुळे अहिल्यानगर जिल्हा नाशिकच्या धार्मिक पर्यटन साखळीतील महत्त्वाचा दुवा ठरेल. त्यामुळे विमानतळ विस्तारासह शिर्डी - नाशिक मार्गातील सुधारणा, यात्रेकरू सुविधा आणि पर्यटनविषयक पायाभूत सुविधांमुळे दोन्ही धार्मिक केंद्रांमधील संपर्क अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. कुंभमेळा काळात शिर्डीमार्गे नाशिककडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीचे नियोजनही महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईकडील मार्गही होणार सक्षम

ठाणे - पालघर आणि कसाराघाटांमार्गे मुंबईकडून नाशिककडे येणारी वाहतूक लक्षात घेता, मुंबई - नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गाची जोडणी महत्त्वाची ठरणार आहे. कुंभकाळात वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन, वाहन नियमन आणि आपत्कालीन सुविधांच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांकडून नियोजन केले जात आहे.

नाशिक - धुळे महामार्गावरील वाहतूक सुधारणावर भर

उत्तर महाराष्ट्रातून नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी धुळे आणि जळगाव हे महत्त्वाचे वाहतूक दुवे ठरणार आहेत. नाशिक - धुळे महामार्गावरील वाहतूक सुधारणा, महामार्ग जोडणी आणि पर्यायी मार्गांचे नियोजन यावर भर दिला जात आहे. बस वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष नियोजन केले जाणार आहे.


जळगावमार्गावर रेल्वे, बससेवा सक्षमीकरण

जळगावमार्गे नाशिककडे येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे आणि रस्ते संपर्क महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वे तसेच बससेवा सक्षमीकरण आणि प्रवासी सुविधांच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांकडून नियोजन केले जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून नाशिककडे येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाला अधिक सक्षम पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

सीमांवरच वाहतुकीचे नियोजन

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या वाहनांचे टप्प्याटप्प्याने नियमन करण्याचे नियोजन आहे. शहराबाहेरील पार्किंगस्थळांवर वाहने थांबवून नियंत्रित क्षेत्रात एसटी महामंडळाच्या विशेष शटल बससेवेचा वापर करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. शेजारील जिल्ह्यांच्या सीमांपासूनच वाहनांच्या प्रवाहाचे नियोजन करण्यावर भर राहणार आहे.


निवारा, पार्किंगचे नियोजन

नाशिकमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी लगतच्या जिल्ह्यांमध्ये आवश्यकतेनुसार भाविकांसाठी तात्पुरते निवारा केंद्र, पार्किंग व्यवस्था आणि मार्गावरील विश्रांतीस्थळे विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भाविकांचा प्रवास टप्प्याटप्प्याने व्यवस्थापित करून नाशिक शहरावरील एकाच वेळी येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT