नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जेलरोड परिसरात जुन्या वादातून फळविक्रेत्यावर रविवारी (दि. १३) रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा संशयितांना अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी संशयितांची परिसरातून धिंड काढत कायद्याचा धाक दाखवला.
जेलरोड परिसरातील मगर चाळीतील रहिवासी व फळविक्रेते इम्तियाज इसरार खान (वय २७) व त्यांचा धाकटा भाऊ आवेश खान हे नोटप्रेस परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करतात. दोन महिन्यांपूर्वी आवेश खान याचा काही संशयितांशी किरकोळ वाद झाला होता.
रविवारी रात्री इम्तियाज खान हे आपल्या पाच वर्षीय मुलीसाठी औषध घेण्यासाठी गेले असता संशयितांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यातून बचाव करण्यासाठी इम्तियाज खान यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
मात्र संशयितांनी धारदार शस्त्रे, लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन त्यांचा पाठलाग केला. ते पाण्याच्या टाकीजवळून मटण मार्केटच्या दिशेने धावत गेल्यानंतर नागरिकांची गर्दी झाल्याने आरोपी तेथून पसार झाले.
उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सोहेल सलीम पठाण, अभिजित साळवे, नीलेश क्षीरसागर, आकाश केळे, राहुल हुडेकर आणि प्रेम डोळस यांना अटक केली.
न्यायालयाने सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी पोलिसांनी आरोपींची दुर्गा मेडिकल, कैलासजी सोसायटी, जेलरोड, पाण्याच्या टाकी व कॅनॉल रोड परिसरातून धिंड काढत परिसरात कायद्याचा धाक निर्माण केला.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, सहायक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.