नाशिक : दैनिक 'पुढारी' आणि संदीप सायन्स इन्स्टिट्युट आयोजित शिक्षकरत्न पुरस्कारप्राप्त शिक्षकांसमवेत आमदार सत्यजित तांबे, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके, संदीप सायन्स इन्स्टिट्युटचे संचालक संदीप घायाळ, सागर दरेकर, निवास संपादक डॉ. राहुल रनाळकर, युनिट हेड बाळासाहेब वाजे आदी.   (छाया : हेमंत घोरपडे )
नाशिक

Nashik 'Shikshakaratna' Award : 'शिक्षकरत्न' पुरस्काराने भारावले शिक्षक अन् विद्यार्थी

कर्मयोगी शिक्षकांचा गौरव : दैनिक 'पुढारी' आणि संदीप सायन्स इन्स्टिट्यूटचा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह रविवारची सकाळ.. सभागृहाबाहेर विद्यार्थ्यांची रांग.. हातात प्रमाणपत्रांच्या फिती, डोळ्यात तेजस्वी उत्सुकता... सभागृहात प्रवेश केल्यावर मंचावर झगमगणारी प्रकाशाची सजावट, शिक्षकरत्न पुरस्काराने शिक्षकांचे गौरवपूर्ण झालेले चेहरे, पालकांचे भावूक डोळे आणि तरुणाईच्या टाळ्यांनी दणाणून गेलेले वातावरण अशा दिमाखात दैनिक पुढारी आणि संदीप सायन्स इन्स्टिट्यूट आयोजित ‘शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा’ अविस्मरणीय ठरला.

संदीप सायन्स इन्स्टिट्युटमधील पुरस्कारर्थी शिक्षकांसमवेत मान्यवर

दैनिक पुढारी व संदीप सायन्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.7) उत्साह, कृतज्ञता आणि टाळ्यांच्या गजरात दिमाखात पार पडला. सभागृहात सकाळपासूनच विद्यार्थ्यांची, पालकांची आणि शिक्षकांची मोठी गर्दी केली होती. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभागृहाला अक्षरशः फुलून टाकले.

नाशिक : शिक्षकरत्न पुरस्कार सोहळ्याप्रसंगी पुरस्कारर्थी विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. व्यासपीठावर आयोजक संदीप सायन्स इन्स्टिट्यूटचे संचालक संदीप घायाळ, सागर दरेकर, दैनिक पुढारीचे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, पुढारीचे युनिट हेड बाळासाहेब वाजे उपस्थितीत होते. उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते यावेळी ४८ नामवंत शिक्षक आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या २० विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आजच्या शैक्षणिक व्यवस्थेतील विसंगती, गोंधळ, आणि विद्यार्थ्यांच्या फोकसवर सोशल मीडियामुळे होणाऱ्या परिणामांवर नेमके भाष्य केले.

‘योग्य मार्गदर्शन मिळाले तर आजची पिढी चमत्कार करू शकते.’ असे दै. पुढारीचे निवासी संपादक डॉ. रनाळकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. हर्षल कोठावदे यांनी सुत्रसंचालन केले.

नाशिक : शिक्षकरत्न पुरस्कार सोहळ्यास शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची झालेली गर्दी.
दैनिक 'पुढारी' चे अवलोकन करताना सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके

सभागृहात अनुभवला भावनिक जल्लोष !

प्रत्येक शिक्षकाचे नाव उच्चारले जाताच विद्यार्थ्यांच्या टाळ्या, आनंदी जल्लोष आणि 'गुरुर्ब्रह्मा'चा गवगवा सभागृहात घुमत होता. अनेकांनी भावनिक क्षण शेअर केले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसाठी उभे राहून दीर्घकाळ टाळ्या वाजवत कृतज्ञता व्यक्त केली. वातावरणात निखळ आदराचे आणि प्रेरणेचे स्पंदन जाणवत होते.

नाशिक जिल्हा... कायद्याचा बालेकिल्ला

सहाय्यक पोलिस आयुक्त मिटके यांचा परिचय करून देत असतांना सभागृहात नाशिक जिल्हा... कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी उस्फूर्तेपणे दिल्या. यावेळी सभागृहातील उपस्थितीतांना घोषणेला हातवर करत दाद दिली.

देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हाती : आमदार सत्यजित तांबे

आमदार सत्यजित तांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सभागृहात प्रचंड उत्साह निर्माण केला. आमदार तांबे म्हणाले की, अकरावी- बारावीचा टप्पा हा आयुष्याला वळण देणारा असतो. शिक्षण पध्दती फक्त परीक्षा पास करण्यापुरती झाली, ही मोठी शोकांतिका आहे. भारत 2020 ला महासत्ता होऊ शकला नाही. पण 2047 चे विकसीत भारताचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, ते केवळ तुमच्या हातात आहे. चौकटीबाहेर विचार करणारे तरुणच देश बदलतात. देशाला चौकटीच्या बाहेर विचार करणाऱ्या तरुणांची गरज आहे. जे तरूण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करतील आणि जे शक्य नाही असे काम करतील तेव्हाच देशाचे स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. पालकांनी ही मुलांना हव्या त्या क्षेत्रात जाऊ द्यावे अन शिक्षकांनी या पिढीला दिशा देण्याचे काम करावे. देश घडविणाऱ्या या भावी पिढीचे भविष्य हे शिक्षकांच्या हाती आहे. यासाठी युवकांनी ‘तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे वाक्य लक्षात ठेवून देशाचे नाव उज्वल करावे. तुम्हाला स्वतःच-आई-वडील, शिक्षक दिशा दाखवतील, चालायचे तुम्हालाच आहे. स्पर्धेत खचू नका, गुण म्हणजे आयुष्याची हमी नाही असा कानमंत्र ही आमदार तांबे यांनी यावेळी दिला.

मानसिक आरोग्य जपा : संदीप मिटके

सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी भाषणात विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि मानसिक ताकद वाढवण्याचे महत्त्व पटवून दिले. मिटके म्हणाले की, आजची शिक्षण पध्दत ही अत्यंत प्रगल्भ झालेली आहे. डाटा, इन्फाॅर्मेशन वर आलेले आहेत. स्पर्धेच्या ताणात अनेक तरुण मार्ग चुकताना दिसतात. योग्य दिशा मिळाली तर तेच तरुण चमत्कार घडवतात.अपराध्यांच्या मानसिकतेवर काम करताना आम्हाला जाणवते की, योग्य वेळेचा योग्य सल्ला आयुष्य बदलू शकतो. शिक्षक आणि पालकांनी सतत गुणांचे दडपण न टाकता मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून प्रत्येक गोष्ट शिकण्याची जिद्द विद्यार्थ्यांनी ठेवण्याची गरज आहे. सन्मानापासून दूर असलेल्या घटकांचा सत्कार केला आहे, हा सत्कार त्यांना पुढील वाटचालीस प्रेरणा देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या शिक्षकांचा झाला गौरव

पंडीत दरेकर, सीमा शिलेदार, चंद्रकांत रहाणे, अशोक जाधव, स्वप्नील कदम, मनीषा पवार, दिनेश राठोड, सुंगधा गायधनी, उज्वला कोथले, पंढरीनाथ पेखळे, ज्ञानेश्वर मोजाड, नितीन सातपुते, ज्योती चौधरी, दत्तू जाधव, ज्योती खांडबहाले, अकुंश वावरे, गोखुळ बोडके, महेश थोरात, चेतन पाटील, सोपान पाटील, सुरेश खांडबहाले, गणेश सोनवणे, मिनाताई थेटे, प्रणवकुमार, छाया पवार, माधवी चिंतामणी, किरण गोरे, नितीन जाधव, प्रणिता कोलते, नेहा पाटील, मनोज मौले, दिपाली पिंगळे, सचिन जाधव, भारती नारखेडे, गौरव घोरपडे, कार्तिक भामरे, सुवर्णा पवार, महेंद्र कोर, विशाल कापडणीस, संगिता बाफणा, सचिन गिते, पूनम झाडे, वृषाली पगारे, संदीप हाके, कैलास हार्डे, सुप्रिया बोडके, मोनाली गवळी, शारदा पवार.

सोहळ्यातील क्षणचित्रे

  • उत्साह, प्रेरणा आणि कृतज्ञतेचा भव्य जल्लोष

  • शिक्षक, विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

  • आमदार तांबे यांच्या प्रेरणादायी भाषणादरम्यान विद्यार्थ्यांकडून टाळ्यांचा कडकडाट

  • पोलिस उपायुक्त मिटके यांच्या आगमनानंतर सभागृहाने दिली टाळ्यांचा कडकडाटाने साद

  • सोहळ्यात शिक्षक, विद्यार्थ्यांचे शिस्तीचे दर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT