नाशिक : भाजपसोबत युतीची शक्यता मावळत चालल्याने शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली असून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.२६) बैठक घेतली जाणार असल्याचे वृत्त आहे.
भाजप व शिवसेने(शिंदेगटा)ची नैसर्गिक युती असल्याचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी मुंबई पाठोपाठ नाशिक महापालिकेत युती करण्याचे निर्देश दिले असले तरी इच्छूकांची मोठी संख्या बंडखोरीचे आव्हान निर्माण करण्याची भीती असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचाच आग्रह धरला आहे. त्यामुळे महायुतीची चर्चा फळास येऊ शकलेली नाही. जागा वाटपावरून युतीचे घोडे अडले आहे.
भाजपकडून शिवसेनेला ३० जागांची ऑफर देण्यात आली असली तरी शिंदे गट ४५ जागांच्या मागणीवर ठाम आहे. राष्ट्रवादीकडूनही ३० जागा मागण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपने युतीची चर्चा थांबविली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना युतीची चर्चा माफ अंतिम निर्णयापर्यंत पोहोचत नसल्याने शिंदे गटाने भाजपचा नाद सोडला असून आता राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती करून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आमदार सुरेश आहेर ज्येष्ठ नेते व माजी खासदार देविदास पिंगळे तसेच शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, यांच्यात शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात बैठक झाली. जागे संदर्भात तोडगा निघाला नसला तरी 26 डिसेंबरला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठकीची दुसरी फेरी होणार असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची युती संदर्भात चर्चा झाली. मात्र जागा वाटपाचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक होणार आहे.रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.