नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवी कोरी पाठ्यपुस्तके देण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन यंदा कोलमडण्याची चिन्हे आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, जिल्ह्यासाठी असलेल्या पुस्तकांपैकी तब्बल ८ लाख ६१ हजार पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत.
सुधारित अभ्यासक्रमामुळे या पुस्तकांच्या छपाई आणि पुरवठ्याला उशीर झाला असून, शाळा सुरू होईपर्यंत हा पुरवठा पूर्ण होईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे. आवश्यक शालेय शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात.
जिल्ह्यात या योजनेचे लाभार्थी असणारे ४ लाख ६६ हजार ४६३ विद्यार्थी आहेत. समग्र शिक्षा विभागाने चालू शैक्षणिक वर्षासाठी बालभारतीकडे एकूण २६ लाख ३८ हजार ८७८ पुस्तकांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी १७ लाख ७७ हजार ८७९ पुस्तके जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, त्यांचे तालुकानिहाय वितरणही पूर्ण झाले आहे.
परंतु, उर्वरित ८ लाख ६१ हजार पुस्तकांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. यामध्ये प्रामुख्याने दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा समावेश आहे. पाठ्यपुस्तक मंडळाकडून (बालभारती) जिल्हा स्तरावरच ही पुस्तके न आल्यामुळे, शाळांना ती कशी पोहोचवायची, असा मोठा प्रश्न स्थानिक शिक्षण विभागासमोर उभा ठाकला आहे.
पालकांमध्ये संभ्रम, विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता
काही इयत्तांची पुस्तके शाळांमध्ये पोहोचली आहेत, तर काही इयत्तांची पुस्तके अजून आलेलीच नाहीत. यामुळे एकाच शाळेतील काही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आणि काहींना नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या गोंधळामुळे यंदा आपल्याला वेळेवर पुस्तके मिळणार की नाही? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दुसरीकडे, शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके पडणार की नाही, या विवंचनेत असलेल्या पालकांकडूनही आता शाळांकडे सातत्याने चौकशी केली जात आहे.
सुधारित अभ्यासक्रमामुळे बालभारतीकडून पुस्तके येण्यास काहीसा उशीर झाला आहे. मात्र, सर्व पुस्तकांची मागणी आधीच नोंदवलेली असल्याने, शाळा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी सर्व पुस्तकांचा पुरवठा पूर्ण होईल.- साईलता सामलेटी शिक्षणाधिकारी, प्राथमिक जि. प.