शालार्थ आयडी गुन्ह्यात फिर्यादी चव्हाण हाच मुख्य संशयित असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितल्याने त्यांचा ताबा घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. Pudhari News Network
नाशिक

Nashik School ID Scam : तत्कालिन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाणवर अटकेची टांगती तलवार

अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव : निलंबनामुळे अडचणी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : भाऊसाहेब चव्हाण याचे शिक्षण व क्रीडा विभागाने निलंबन केल्याने, त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलिसांकडून त्यास केव्हांही अटक केली जाण्याची शक्यता असून, अटकपूर्व जामिनासाठी त्याची धावाधाव सुरू आहे. दरम्यान, त्याच्या अटकपूर्व जामिनावर लवकरच सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.

'शालार्थ आयडी' घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शिक्षण मंडळाचा सेवानिवृत्त अध्यक्ष नितीन उपासणी याला अटक केल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याने, पोलिसांकडून तपासाची चक्रे गतिमान करण्यात आली आहे. कारण या प्रकरणातील फिर्यादीच या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य संशयित असल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नाशिकचे तत्कालिन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याच्या फिर्यादीवरून गेल्या २७ मार्च २०२५ रोजी नाशिकरोड पोलिसात 'शालार्थ आयडी' घोटाळ्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील दहा शिक्षण संस्थांसह शालेय पदाधिकाऱ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, लिपिकांसोबत संगनमत करून बनावट शालार्थ आयडी बनविल्याचा हा गुन्हा आहे. मात्र, या गुन्ह्यात फिर्यादी चव्हाण हाच मुख्य संशयित असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितल्याने त्याचा ताबा घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच चव्हाणचे अमरावती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा विभागीय सचिव पदावरून निलंबन केल्याने, अटकेची शक्यता बळावली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरी सहसंशयित

याप्रकरणात अंमळनेर येथून संशयित मनोज रामचंद्र पाटील (रा. नवलनगर, धुळे), नीलेश निंबा पाटील (रा. चिंचोली, ता. चोपडा) या दोघांसह अविनाश पाटील, दत्तात्रय पाटील (वय ६५) यांनाही अटक केली होती. त्यापैकी मनोज व दत्तात्रय हे शिक्षण संस्थाचालक असून, नीलेश हा जिल्हा परिषदेतील कर्मचारी आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामदास शेळके यासंदर्भात विस्तृत तपास करीत आहेत. गुन्ह्यात नाशिकरोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी सहसंशयित आहेत. त्याचेही निलंबन झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT