

नाशिक : बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीचा ताबा नाशिक ग्रामीण पोलिसांचा आर्थिक गुन्हे शाखे विभाग घेणार आहे. या संदर्भात शिक्षण विभागाशी त्यांचा पत्रव्यवहार झाला आहे. लवकरच ही कारवाई केली जाणार आहे.
या घोटाळ्यात नाशिक विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण हेही मुख्य संशयित असल्याचे समोर आले असून लवकरच त्यांनाही अटक होणार आहे. बनावट शालार्थ आयडी तयार करत त्यांची लाखो रुपये घेत बनावट शालार्थ आयडी दिल्याच्या आरोपात अटक झालेला माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. उपासनीने जामिनासाठी न्यायालयात अर्जही केला आहे.
शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी अमळनेर येथून चौघांना अटक करत शालार्थ आयडी घोटाळ्याचा छडा लावला होता. या तपासादरम्यान नाशिकरोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अशोक गिरी यांनी संशयित शरद शिंदे, किरण पाटील आणि अविनाश पाटील यांच्याशी संगनमत करून पुराव्यांत छेडछाड केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गिरी यांना निलंबित केले आहे. दरम्यान, ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने मालेगावातील काही संस्थांमधील शिक्षक - कर्मचाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करत हजारहून अधिक शालार्थ आयडी तयार व विक्री करण्याच्या प्रकरणात उपासनीची काही महिन्यांपूर्वीच चौकशी केली होती. मात्र, प्रभाव टाकून त्याने अटकेपासून सुटका करून घेतली होती. शहर पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर आता ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेनेही त्याचा ताबा मागितला असून दुसऱ्यांदा अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. उपासनीने नेमके किती आयडी तयार केले, यात कोणकोण सहभागी आहे, याचा व्यापक तपास केला जाणार आहे. पोलिसांनी त्याच्या स्वाक्षरीचे नमुने जप्त करत एफएसएलकडे पाठवले आहे.