Human Trafficking Case Pudhari File Photo
नाशिक

Nashik Human Trafficking Case | इव्हेंटच्या कामाचे आमिष अन् थेट लग्नाचा मांडव! 19 वर्षीय तरुणीची 2 लाखांत विक्री...

Nashik Human Trafficking Case | विवाहाच्या आमिषाने दोन लाख रुपये घेऊन १९ वर्षीय युवतीची विक्री करत तिचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विवाहाच्या आमिषाने दोन लाख रुपये घेऊन १९ वर्षीय युवतीची विक्री करत तिचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सातपूर पोलिस ठाण्याने तातडीने कारवाई करत तिची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणामुळे मानव तस्करीचा गंभीर गुन्ह्याचा संशय व्यक्त होत आहे. सातपूर येथील सपना बुगप्पा कानकुर्ते (रा. कार्बन नाका, सातपूर) यांनी शनिवारी (दि. २८) सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेत एक १९ वर्षीय युवती शुक्रवारी (दि. २७) न सांगता निघून गेल्याची माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने फोन करत राणी व भागी या महिलांनी दोन लाख रुपये घेऊन तिची विक्री करत तिला जातेगाव (ता. नांदगाव) येथे घेऊन जात नवनाथ शिरडकर याच्याशी जबरदस्तीने विवाह लावून दिल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी तातडीने तपास पथक रवाना केले.

पोलिस उपनिरीक्षक राकेश न्हाहळदे, हवालदार दीपक खरपडे, वंदना पवार यांनी नांदगाव पोलिस ठाण्याच्या मदतीने जातेगावला शोध घेतला. कारवाई दरम्यान २०० ते ३०० नागरिकांनी पोलिसांना घेराव घालत आम्ही २ लाख रुपये देऊन विवाह केल्याचा दावा करत मुलगी ताब्यात देण्यास नकार दिला.

परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांची कुमक मागवण्यात आली. नांदगावचे पोलिस निरीक्षक भदाणे यांच्या सहकार्याने तरुणीची सुटका करण्यात आली. नांदगाव येथे चौकशीदरम्यान या मुलीने राणी व भागी यांनी इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवत प्रथम मालेगाव व नंतर जातेगाव येथे आणत जबरदस्तीने विवाह लावल्याची माहिती दिली. राणी, भागी तसेच संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT