Nashik Satpur kidnapping attempt
नाशिक : नाशिकच्या सातपूर परिसरात भरदिवसा घडलेल्या अपहरणाच्या प्रयत्नामुळे एकच खळबळ उडाली आहे. सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात ६ ते ७ जणांनी एका तरुणाला जबरदस्तीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपहरणकर्त्यांनी अचानक हल्ला चढवत तरुणाला गाडीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीव मुठीत धरून या तरुणाने धैर्य दाखवले व अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पळ काढून थेट सातपूर पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल शूटिंगमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाल्याने पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या घटनेनंतर सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भरदिवसा झालेल्या अपहरणाच्या प्रयत्नाने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.