नाशिक : सातपूर विभागातील महादेववाडी येथील खोका मार्केटमधील धोकादायक झाडांचा विस्तार कमी करताना लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या पाच व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमी महिलेला दोन लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासंदर्भात उद्यान विभागातर्फे महासभेच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात सातपूरमधील खोका मार्केट येथे दुर्घटना घडली होती. पिंपळ वृक्षाचा विस्तार कमी करताना कटर मशीनसाठी आणलेल्या पेट्रोलच्या कॅनला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे पेट्रोललगत उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर सांडले. या दरम्यान एक नागरिक विडी पित असल्याने पेट्रोलचा भडका उडाला होता. या दुर्घटनेत तीन महिला, दोन पुरुष व मुलगा असे सहा जण गंभीर भाजले होते. दुर्घटनेतील जखमी नागरिकांना तातडीने जिल्हा रूग्णालय आणि त्यानंतर तेथून मुंबई येथील रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यात चार व्यक्ती आणि बालकाचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तीवर उपचार होऊन तिला घरी सोडण्यात आले आहे.
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना मनपामार्फत भरपाई द्यावी, अशी मागणी त्यावेळी लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी संबंधित मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमी व्यक्तीला दोन लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने प्रस्ताव तया करून तो महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता.
दोबाडे, गाडेकर कुटुंबीयांना मदत
दुर्घटनेतील मृत कैलास छगन दोबाडे, पंकज कैलास दोबाडे, सोनाली राजेशगाडेकर, दुर्गा आकाश दोबाडे व भावना आकाश दोबाडे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, तर जखमी लता कैलास दोबाडे यांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी २७ लाखांचा खर्च हा वृक्षनिधीतून केला जाणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली.