

सातपूर (नाशिक) : येथील महादेववाडी परिसरात ८ ऑक्टोबरला रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी सुरु असताना पेट्रोलच्या कॅनचा भडका उडून आग लागण्याच्या दुर्घटनेत भाजलेल्या सहापैकी चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असतानाच, आता गंभीर जखमी असलेल्या दीड वर्षीय भावेश आकाश दोबाडे याचाही मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भावेश या दुर्घटनेत गंभीर भाजला होता. त्याच्यावर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती ढासाळत गेली आणि उपचारादरम्यान २७ ऑक्टोबरला भावेशचा मृत्यू झाला. यामुळे दोबाडे कुटुंबावरचा दुःखाचा डोंगर अधिकच वाढला असून, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता पाचवर पोहोचला आहे. यात दोबाडे कुटूंबातील चौघांचा समावेश आहे.
पाच मृतांमध्ये चौघे प्रौढ, एक बालक
पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिक कॅनवरून चारचाकी वाहन गेल्याने भडका उडून रस्त्याच्या बाजूला उभे असलेले सहा जण भाजले होते. या दुर्घटनेत गंभीर भाजलेल्यांपैकी पंकज कैलास दोबाडे (वय ३०), दुर्गा दोबाडे (वय २२), कैलास छगन दोबाडे (वय ६०) आणि सोनाली राजेश गाडेकर यांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता भावेशच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या ५ झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी झाडांची छाटणी करणारा ठेकेदार आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केलेला आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा केली आहे. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.