सटाणा (नाशिक) : ज्या नगरपरिषदेच्या सभागृहात तब्बल दोन दशके स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवा दिली, त्याच सभागृहात आज नगरसेविका म्हणून बसण्याचा मान सटाण्यातील लताबाई पोपटराव बच्छाव यांना मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सटाणा नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी प्रभाग 10-अ मधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या या यशाची शहरभर चर्चा होत आहे.
प्रभाग 10-अ मधील रहिवासी असलेल्या लताबाई बच्छाव यांनी सुमारे 22 वर्षांपूर्वी सासूच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सटाणा नगरपरिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम सुरू केले. प्रारंभी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी कधीही खचून न जाता प्रामाणिकपणे काम करत कुटुंबाचा गाडा हाकला. या कामाच्या जोरावर त्यांनी आपल्या चारही मुलांना उच्च शिक्षण दिले आणि त्यांना सरकारी सेवेत अधिकारी पदापर्यंत पोहोचवले.
नोकरीसोबतच समाजसेवेची आवड त्यांनी सातत्याने जोपासली. पती पोपटराव बच्छाव यांनाही समाजकार्यात रस असल्याने दोघेही नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी नेहमी पुढे येत राहिले. या सामाजिक कार्याची दखल घेत नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. या संधीचे सोने करत लताबाई बच्छाव यांनी 1,218 मते घेत विजय मिळवला.
शहराची स्वच्छता करणारी ही महिला आता स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याने त्यांचा विजय सटाण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळेच आज मला स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून थेट सभागृहात प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे. आजवर शहर स्वच्छ ठेवले, आता प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणि विकासासाठी स्वच्छतेची मोहिम राबवणार आहे.लताबाई पोपटराव बच्छाव, नगरसेविका, प्रभाग 10-अ, सटाणा