नाशिक : केशर आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटणारच. त्यातही हा आंबा सेंद्रिय आणि मधुमक्षिकांच्या मदतीने नैर्सगिकरीत्या पिकवला, तर त्याचे माधुर्य अधिकच वाढते. अशाच मधाळ चवीचा रसाळ आंबा नाशिककरांसाठी सोमवार (दि. 2) पासून उपलब्ध होत आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परिसरात संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या आंब्याचे जतन व संवर्धनासाठी सेंद्रिय खतांसमवेत परागीभवनासाठी मधमाश्यांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. दरवर्षी या आंब्याची प्रतीक्षा नाशिककर करत असतात. मध्यंतरी काही वर्षे अवकाळी पाऊस व वादळवाऱ्यामुळे या आंबा पिकांचे नुकसान होऊन उत्पादन घटले होते. त्यानंतर विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने संशोधनात्मक प्रयोग केले गेले. यामुळे दरवर्षी मिळणारे १५ ते २० टनांचे उत्पादन यंदा २५ ते ३० टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या आंब्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
काही वर्षे आंब्याचा फुलोरा येण्याच्या काळातच अवकाळी पाऊस पडत गेला. यंदाही तसेच झाले. त्यावर उपाय म्हणून विद्यापीठाचे 'केव्हीके'ने मधमाश्यांचा वापर करण्याचा प्रयोग केला. कोथी (ट्रायगोना) नावाची मधमाशी आंब्याच्या परागीभवनासाठी सर्वोत्कृष्ट 'आर्किटेक्ट' ठरत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे यंदा आमराईमध्ये कोथी (ट्रायगोना) व 'सातेरी' नावाच्या मधमाश्यांच्या पेट्या ठेवण्यात आल्या. परिणामी मोहोर आल्यावर परागीभवन व बळकटीकरणाचे काम योग्य पद्धतीने झाले. अवकाळी फटक्यात आमराईतील फुलोरा व नंतर फळे शाबूत राहिली. विद्यापीठात आंबा उत्पादनासंबंधी शेतकरी वर्गास सातत्याने मार्गदर्शन, प्रशिक्षण देत आंबा रोपांची विक्रीदेखील केली जाते. याच झाडांपासून विद्यापीठाने यावर्षी आंब्याची जवळपास ५० हजार कलमी रोपे तयार केली तसेच उत्पादनात भरघोस वाढ नोंदवली गेली.
मुक्त विद्यापीठ आवारात १९९६ पासून केशर आंब्याची बाग केली गेली. २५ वर्षांपूर्वी 'रत्ना' व 'सिंधू' या हापूस आंब्याच्या उपजातींच्या रोपांची लागवड विद्यापीठ आवारात करण्यात आली. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रा (केव्हीके)ने गांडूळ तसेच कंपोस्ट खतांचा वापर केल्यामुळे ही आम्ररोपे चांगल्या पद्धतीने वाढली. काही वर्षांतच ती फुलली, मोहोरली आणि फळली. या आंब्याच्या चवीची ख्याती अल्पावधीतच सर्वदूर पसरली. नाशिकसह अन्य तालुके, गावांहूनही आंबाप्रेमी याच्या खरेदीसाठी विद्यापीठात येत आहेत.