

नाशिक : विकास गामणे
मधुमक्षिका पालनातून उत्पन्नवाढीसाठी आणि दर्जा सुधारण्यासाठी राज्यात 'मधाचे गाव' योजना राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात मांघर (महाबळेश्वर) आणि पाटगाव (भूदरगड) येथे योजना सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 10 गावांमध्ये योजना विस्तारणार असून, त्यामध्ये नाशिकमधील चाकोरे (त्र्यंबकेश्वर) गावाचा समावेश आहे. योजनेंतर्गत या गावांसाठी पाच कोटी एक लाख 97 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मधुमक्षिका पालन हा राज्यातील महत्त्वाचा जोडधंदा होऊ पाहात आहे. मधमाश्या या केवळ मध आणि मेणच देत नाहीत, तर त्या परागीकरणामुळे शेतीपीक उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ करतात, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावाच्या सकल उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी मधाचे गाव ही संकल्पना पुढे आली.
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मे २०२२ मध्ये महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून विकसित झाले. त्यापाठोपाठ कोल्हापूरमधील पाटगावही मधाचे गाव झाले. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 10 गावांमध्ये ही योजना राबवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी पाच कोटी एक लाख 97 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ही योजना एक वर्षापुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी गावाची असेल तसे हमीपत्र ग्रामपंचायतीकडून घेण्यात येणार आहे. तसेच अधिक निधी हवा असल्यास त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. राज्यात मधाचे गाव योजना राबवण्यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.
राज्यातील वनसंपदा, फुलशेती व मधमाशी पालन करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून गावांची निवड.
मधासाठी उपयुक्त वनस्पतीलागवड, पालन, संकलन, प्रक्रिया, ब्रॅण्डिंग व विक्रीची संपूर्ण साखळी उभारणी.
मध व उपउत्पादनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन.
ग्रामीण तरुणांना मधमाशी पालनास प्रवृत्त करून रोजगारनिर्मिती.
मधमाशी संवर्धनातून शेती उत्पन्नवाढ व गाव हा लाभार्थी घटक म्हणून विकसित करणे.
घोलवड (ता. डहाणू, जि. पालघर) : 54 लाख
भंडारवाडी (ता. किनवट, जि. नांदेड) : 53 लाख
बोरझर (ता. नवापूर, जि. नंदुरबार) : 48 लाख
काकडदाभा (ता. औंढानागनाथ, जि. हिंगोली) : 49 लाख
चाकोरे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) : 40.22 लाख
उडदावणे (ता. अकोले, जि. अहिल्यानगर ) : 46.75 लाख
शेलमोहा (ता. गंगाखेड, जि. परभणी) : 54 लाख
सिंधीविहिर (ता. कारंजा, जि. वर्धा) : 54 लाख
सालोशी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) : 49 लाख
आमझरी (ता. अमरावती, जि. अमरावती) : 54 लाख