नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हामुळे जलसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये १०९ गावे व २३८ वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या २३८ टँकरच्या माध्यमातून २ लाख ५७४ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा तीव्र कडाका जाणवत आहे. यंदाच्या कमाल तापमानामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत असून, हंगामात ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. या वाढलेल्या उन्हामुळे ग्रामीण भागातील जलसाठ्यामंधील पाणी झपाट्याने कमी झाले आहे.
विहिरी, बोअरवेल आणि लहान जलस्रोत आटले आहेत. यामुळे नागरिकांना भर उन्हामध्ये पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या पाणीटंचाईवर तात्पुरता उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने १०९ गावांसह २३८ वाड्यांवर ११८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.
तसेच तीन गावांसाठी ५ विहिरी व टँकरसाठी ४७ अशा एकूण ५२ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाकडून करण्यात आले आहे. चंद्रगिरी वीटर सप्लायर बाळांकहार येवल्यामध्ये सर्वाधिक ३६ गावे व ४७ वाड्या अशा एकूण ८३ ठिकणी पाणीटंचाई निर्माण झाली असून, ३३ ट्रॅकद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
त्याखालोखाल इगतपुरीमध्ये ८ गावे ४१ वाड्यासाठी २० टँकर सुरू करण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांमधील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होणार असून, ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.