नाशिक : शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूने (H1N1) आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांत तब्बल ३३ स्वाईन फ्लूबाधित रुग्ण आढळून आले आहे तर, दोघांचा मृत्यू झाल्याने ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे. केवळ स्वाइन फ्लूच नव्हे, तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही झपाट्याने वाढला आहे. या वाढत्या आजारांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १०० हून अधिक स्वाइन फ्लूबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात ऑगस्ट महिन्यात ५७ आणि सप्टेंबरच्या रुग्णांची नोंद झाली आहे. शहरानंतर ग्रामीण भागातही स्वाइन फ्लू रुग्ण वाढले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत ग्रामीण भागात ४० रुग्ण, तर महापालिका क्षेत्रासह) २३१ रुग्णांना लागण झाली आहे.
यामध्ये ऑगस्ट महिन्यात २७ आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच ६ रुग्णांना महिन्यात स्वाइन फ्लूची लागण झालेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. जानेवारीपासून १० सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे सुमारे ६६ रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये २३ आणि सप्टेंबरमध्ये ६ सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. मलेरियाचे नऊ महिन्यांत २१ रुग्ण सापडल्याची नोंद आहे, तर ४ जणांना चिकनगुनियाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.
ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे ही स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणे आहेत, तर तीव्र ताप, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी आणि डोकेदुखी ही डेंग्यू व चिकनगुनियाची लक्षणे आहेत. अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी अंगावर न काढता किंवा परस्पर औषधे न घेता जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावेत.
- डॉ. राजेंद्र बागूल (जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.)
आरोग्य प्रशासनाची उपाययोजना
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि उपकेंद्रांना हाय अलर्ट जारी केला आहे.
स्वाइन फ्लूवरील उपचारासाठी आवश्यक असणारा 'टॅमीफ्लू' गोळ्यांचा पुरेसा साठा प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचविला आहे.
संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्यसेवकांचे पथक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावागावांत धूर फवारणी आणि अबेट कोडिंगची कारवाई सुरू करण्यात आली आहे.