नाशिक

Nashik Road Prabhag | अतिक्रमण अधिकाऱ्याला सभागृहाबाहेर काढले

Nashik Road Prabhag | नगरसेवकांकडून प्रश्नांचा पाऊस : नाशिकरोड प्रभाग समिती सभेत वादळी चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

चार वर्षांनंतर झालेल्या नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत अतिक्रमण, उद्यान, पाणीपुरवठा, पथदीप, खोदकाम आदी विषयांवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश देण्यात आल्याने ही बैठक चांगलीच वादळी ठरली, प्रभाग सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या नाशिकरोड कार्यालयात बैठक पार पडली.

निवडणुकीनंतर प्रथमच होत असलेल्या या बैठकीला दोन नगरसेवक वगळता सर्व सदस्य उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेवक शरद मोरे यांनी अतिक्रमण विभागावर गंभीर आरोप करत राजराजेश्वरी परिसरात भाजीपाला विक्रेत्यांकडून हप्तेवसुली केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांचा माल जप्त करून त्याची विक्री होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यानंतर केशव पोरजे, सीमा ताजणे, प्रशांत दिवे यांच्यासह सदस्यांनी अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांवर टीका करत त्यांना सभागृहाबाहेर पाठविण्याची मागणी केली. सभापती रमेश धोंगडेयांनी संबंधितांना बाहेर जाण्याचे आदेश दिले.

लवकरच विद्युततारा हटविणार

नगरसेवक कैलास मुदलियार यांनी शहरातील पथदिव्यांवर केबल व इंटरनेटच्या बेकायदेशीर तारा टाकल्याने अपघाताचा धोका वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला. दत्त मंदिर परिसरात वायरमध्ये पाय अडकून एका निवृत्त लोकोपायलटचा मृत्यू झाल्याचे उदाहरण देत तातडीने कारवाईची मागणी केली. यावर सभापतींनी उपनगर, सौभाग्यनगर, विहितगाव रोड, सिन्नर फाटा, जेलरोडसह संपूर्ण नाशिकरोड परिसरातील बेकायदेशीर तारा सात दिवसांत हटविण्याचे निर्देश दिले.

सहा प्रभागांसाठी अवघे सहा टँकर

नगरसेविका श्वेता भंडारी यांनी पाणीकपातीच्या दिवशी झोपडपट्टी भागात पाणीपुरवठ्यासाठी टैंकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. नगरसेविका सुनीता भोजने यांनी खोदकामादरम्यान पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन वारंवार फुटत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आणले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी अवघे सहा टँकर अपुरे असल्याचा आरोप करत टँकरची संख्या वाढविण्याची मागणी सदस्यांनी केली.

विभागीय अधिकाऱ्यांची बोलती बंद

चार वर्षे प्रशासनावर कोणत्याही लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने मनमानी कारभार झाला, असा आरोप अनेक नगरसेवकांनी केला. विविध प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर विभागीय अधिकारी डॉ. प्रज्ञा त्रिभुवन यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना अनेक मुद्यांवर समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, तर काही अधिकाऱ्यांनी आम्ही नवीन आहोत, असे सांगत उत्तरांना बगल दिली.

बोलू दिले नाही तर वॉकआउटचा इशारा

बैठकीत सुरुवातीला काही सदस्यांनाच बोलण्याची संधी मिळत असल्याचा आरोप करत केशव पोरजे, योगेश भोर यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी वॉकआउटचा इशारा दिला. त्यानंतर सभापती रमेश धोंगडे यांनी सर्व सदस्यांना समान संधी दिली जाईल व कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. प्रभारी नगरसचिव संजय नेरकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT