नाशिक

Nashik road news: महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; कार्बन नाका रस्ता पुन्हा खचला

मनपाच्या थातुरमातुर कामांचा फटका : 'टास्क फोर्स' कागदावर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सातपूर विभागातील कार्बन नाका येथील रस्ता खचल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यावेळी महापालिकेने रस्त्याची डागडुजीही केली होती. मात्र, ती डागडुजी थातुरमातुर असल्याचे समोर आले. शनिवारी (दि. २५) हा रस्ता पुन्हा खचल्यामुळे त्या ठिकाणी मोठा अपघात होता होता राहिला. मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या मधोमध अडकला. ट्रकचालकाने समयसूचकता दाखविल्याने अपघात टळला. मात्र, महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले.

सिंहस्थ कुंभमेळ्यानियमित या भागातही विकासकामे सुरू आहेत. या मार्गावर पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने डागडुजी करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने थातुरमातुर कामे करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. परिणामी दमदार पावसामुळे महापालिकेने रस्त्यावर टाकलेला भरावा वाहून गेल्याने रस्ता पुन्हा एकदा खचला. दरम्यान, ठेकेदारांकडून बेसुमार खोदकाम केले जात असून, रस्ता दुरुस्तीची अजिबातच हमी घेतली जात नाही. सलग दुसऱ्यांदा एकाच ठिकाणी रस्ता खचल्याची घटना घडल्यामुळे यास जबाबदार संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारास पाठीशी तर घातले जात नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

महापौौर, आयुक्तांना दिली माहिती

शनिवारी (दि. २५) सकाळी ७ च्या सुमारास रस्ता खचल्याची माहिती काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापौर, उपमहापौर आणि महापालिका आयुक्तांना व्हॉट्सअॅपद्वारे दिली. मात्र, तरीही महापालिकेचा एकही कर्मचारी घटनास्थलळी फसला नाही. नगरसेवक अमोल पाटील हे जेव्हा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा ते जखमी झाले होते. त्यांचीही विचारपूस करण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखविले नसल्याचा आरोप नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला.

सकाळी ७ च्या सुमारास महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांना व्हॉट्सअॅपद्वारे रस्त्याची दूरवस्था कळवली. मात्र अद्याप एकही अधिकारी घटनास्थलळी आलेला नाही. कामाची पाहणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधी अमोल पाटील जखमी झाले. अधिकारी वेळेत काम करत असते, तर हा प्रसंग ओढवला असता का? मोठा गाजावाजा करून सुरू केलेला मनपाचा टास्क फोर्स केवळ नावाचा उरला आहे.
दिनकर पाटील, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT