नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन अहिल्यानगरच्या दोघांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड परिसरात उघडकीस आली.
याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात राहुल सुरेश जाधव ऊर्फ परश्या जाधव (१८) जयशिंग रमेश वाघ (२६, दोघेही रा. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारी (दि. १०) पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पीडित मुलगी शहरातील एका नामवंत शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. सुमारे दोन-अडीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील आयडीवरून संशयित परश्या जाधव याने पीडितेशी ओळख वाढवली होती.
त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, घरच्यांच्या भीतीपोटी ती त्याला भेटण्यास टाळत होती. सोशल मीडियावरील तरुणाच्या आमिषाला बळी पडणाऱ्या मुलीने अखेर पोलिसांत तक्रार दिली आणि या घटनेची गांभीयनि दखल घेत पोलिसांनी थेट अहिल्यानगरवरून २४ तासांच्या आत दोन्ही तरुणांना अटकेची कारवाई केली.
धमकी देत भेटायला बोलावले...
४ मार्च रोजी सकाळी संशयित परश्या याने पीडितेच्या मोबाइलवर फोन करून तिला नाशिकरोड बसस्थानक येथे भेटण्यास बोलावले. 'जर भेटायला आली नाही तर तुला मारून टाकेन', अशी धमकी त्याने दिल्याने पीडिता घाबरली आणि बसस्थानकावर पोहोचली. तेथे संशयित परश्या आणि त्याचा २० ते २५ वयोगटातील एक साथीदार दुचाकीसह हजर होते.
संशयितांनी पीडितेला दुचाकीवर बसवून चेहेडी गावाजवळील नदीकाठच्या निर्जन जंगलात नेले. तेथे दुपारी १ च्या सुमारास संशयित परश्याने पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराने पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये चित्रीत केले. या प्रकारानंतर संशयितांनी पीडितेला पुन्हा बसस्थानक परिसरात सोडून पळ काढला.