नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जेलरोड परिसरातील महारुद्र कॉलनी, वसंत विहार, अरिंगळे चाळ येथे सोमवारी सकाळी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने नाशिकरोड परिसर हादरला. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सातवर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
या घटनेत अश्विनी किरण हजारे (४३) आणि मुलगा श्रेयस किरण हजारे (७) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी पती किरण हजारे (५४) याने आपल्या स्वतःच्या हाताची नस कापत विषारी औषध सेवन केल्याने त्याला प्रथम बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.
किरण आणि नाशिकरोड येथील अश्विनी हजारे यांचा २०१७ मध्ये विवाह झाला होता. दोघांचाही पुनर्विवाह झाला होता. किरण हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्रकल्पांच्या मार्केटिंगचे काम करीत होता. गेल्या सात महिन्यांपासून हे कुटुंब वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत भाड्याने राहत होते.
रविवारी रात्री तिघेही अश्विनी यांच्या माहेरी जेवणासाठी गेले होते. तिथून परतल्यानंतर सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी बराच वेळ घराचे दार न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता माय-लेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
यांनंतर घरमालकाला माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
या प्रकरणात आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपी किरण हजारे उपचारांनंतर बोलण्याच्या स्थितीत आल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
घटनेच्या पूर्वसंध्येला अश्विनी हजारे या पती आणि मुलासह आईच्या आग्रहास्तव माहेरी जेवणासाठी गेल्या होत्या. सर्वांनी आनंदात जेवण करून गप्पा मारून श्रेयसला सोमवारी सकाळी शाळेत जायचं असल्याकारणाने त्या घरी परतल्या. दुसऱ्याच दिवशी लेक आणि नातवाचा खून झाल्याची माहिती मिळताच अश्विनी यांच्या आईने एकच हंबरडा फोडला. आईच्या हातचे ते जेवणच अश्विनी आणि श्रेयस यांचे अखेरचे ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.