नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड बसस्थानकाच्या जागेचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने हे बसस्थानक तीन महिन्यांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यासाठी बसस्थानकाची जागा ठेकेदारास ताब्यात देण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) काही बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिकरोड बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेस आता थेट रेल्वेस्थानकापलीकडील सिटीलिंकच्या आगारातून सोडल्या जाणार आहेत.
ही नवीन वाहतूक व्यवस्था गुरुवार (दि. १०) पासून लागू करण्यात आली आहे.
नाशिकरोड रेल्वेस्थानक ते त्र्यंबकेश्वर तसेच नाशिकरोड रेल्वेस्थानक ते दिंडोरी या दोन्ही मार्गांवरील बससेवेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून सुटणाऱ्या इतर मार्गांवरील बससेवा आता नाशिकरोड आगारामार्फत चालवण्यात येणार आहे.
यामध्ये बारदान फाटा, सिम्बायोसिस, अंबड, ओझर गाव, हिंगणवेढा, एकलहरे, म्हाडा, गंगापूर गाव, ओझर एअरफोर्स आणि बोरगड या भागांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बससेवेचा समावेश आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवरील प्रवाशांनी बससेवेच्या नवीन ठिकाणाची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.
वाहतूक मार्गातील बदलामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल सिटीलिंक प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी बदललेल्या व्यवस्थेची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, काँक्रिटीकरणाच्या कामामुळे नाशिकरोड बसस्थानक परिसरातील सिटीलिंकचे पास केंद्रही काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरते बंद राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पासधारकांनी पास काढण्यासाठी नाशिकरोडऐवजी तपोवन आगार किंवा सिटीलिंक कार्यालय, गोल्फ क्लब, त्र्यंबक रोड येथे संपर्क साधावा. पासचे नूतनीकरण करावयाचे असल्यास शक्यतो ऑनलाइन नूतनीकरणाचा पर्याय वापरावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.