blood component bank Pudhari
नाशिक

Bitko Hospital Blood Bank | नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात अत्याधुनिक 'ब्लड बँक' सज्ज! सोमवारी होणार दिमाखदार लोकार्पण

Bitko Hospital Blood Bank | वेळेत रक्ताची उपलब्धता; मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या लोकार्पण

पुढारी वृत्तसेवा

नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा

गोरगरीब रुग्णांसाठी मोठा आधार ठरणाऱ्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात अत्याधुनिक ब्लड कम्पोनन्ट बँक (रक्त घटक बँक) सज्ज झाली आहे. या बँकेचे लोकार्पण सोमवारी (दि. १३) महापौर, उपमहापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये ही सर्वाधिक सुसज्ज व आधुनिक ब्लड बँक ठरणार आहे.

महापालिकेच्या बिटको रुग्णालयात जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मागील २५ वर्षांपासून येथे रक्तपेढी कार्यरत होती; मात्र रक्त घटक वेगळे करण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. कोविड काळात जुन्या इमारतीतून चार मजली नवीन रुग्णालयात रुग्णालयाचे स्थलांतर झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढली आणि ब्लड कम्पोनन्ट बँकेची गरज प्रकर्षाने जाणवू लागली होती.

सध्या बिटको रुग्णालयात दररोज सुमारे ३०० रुग्ण ओपीडीसह विविध कारणांसाठी येतात. रक्ताची गरज भासल्यास रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. यासाठी वेळ व अधिक खर्च करावा लागत होता.

नव्या सुविधेमुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊन जीव वाचण्यास मदत होणार आहे. या सुविधेमुळे रुग्णांना बाहेरील रुग्णालयात जाण्याची गरज उरणार नाही. उलट बिटको रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयालाही मदत करता येईल. ब्लड बॅग व सेवांचे दर हे परवडणारे असणार असल्याने खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक पिळवणूकही टळणार आहे.

कठोर निकषांची पूर्तता

ब्लड बँक सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे कठोर निकष पूर्ण करणे आवश्यक असते. आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधा यांचा त्यात समावेश होतो. नाशिक, मुंबई आणि नवी दिल्ली या तीन स्तरांवर परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. रुग्णालय प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या ब्लड बँकेला मान्यता मिळाली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ती कार्यान्वित होणार आहे.

बिटको रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांसाठी अद्ययावत ब्लड बँक सुरू व्हावी, यासाठी मी काही वर्षांपासून प्रयत्न करत होतो. याबाबत नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांशी चर्चा केली होती आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
- जगदीश पवार, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT