Nashik Ring Road  
नाशिक

Nashik Ring Road | नाशिक रिंग रोडचे काम तुर्तास स्थगित! इंदिरानगरमधील शेतकरी ठिय्या आंदोलनाला अखेर यश

Nashik Ring Road | पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : शेतकरी महिलांनी महाजनांना बांधल्या राख्या

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक परिक्रमा मार्ग (रिंग रोड), हायवे क्रमांक २९ चिंचखेड ते जोपूळ-दिंडोरी तसेच पाथर्डी कचरा डेपो बाधित शेतकऱ्यांच्या गेल्या दोन दिवसांपासून इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला गुरुवारी (दि. २७) यश आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होऊन प्रश्नांवर अंतिम तोडगा निघेपर्यंत रिंग रोडसंदर्भातील पुढील कामे स्थगित ठेवण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनस्थळी पालकमंत्री महाजन यांनी भेट देऊन सुमारे ५०० ते ६०० शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण आंदोलनस्थळी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्यातील तफावत, ग्रामीण भागासाठी गुणांक दोन लागू करणे, फळझाडांना मिळणारा अपुरा मोबदला, एकाच गावातील जमिनींना वेगवेगळे दर, रिंग रोडच्या आखणीबाबतचे आक्षेप व त्यासंदर्भातील पुरावे यासह प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व आर्थिक नुकसान याबाबत पालकमंत्र्यांसमोर भूमिका मांडली.

हायवे क्रमांक २९ साठी कोणतेही विनामौबदला भूसंपादन होऊ देणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी किसान सभेचे सरचिटणीस राजू देसले, शेतकरी नेते नाना बच्छाव, छावा क्रांतिवीर सेनेचे शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, शुभम देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत रिंग रोडची मोजणी, भूसंपादन, जमीन खरेदी, नोटीसा अथवा शेतकऱ्यांवर परिणाम करणारी कोणतीही प्रशासकीय कारवाई करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्याची तात्काळ दखल घेत महाजन यांनी आंदोलनस्थळावरूनच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत रिंग रोडसंदर्भातील पुढील कामे स्थगित ठेवण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये, तसेच बैठकीपूर्वी घाईघाईने कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी बजावले.

दोन-तीन दिवसांत मंत्रालयात बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली असून, २८ ऑगस्ट रोजी त्यांचा नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्याने त्या दिवशी बैठक शक्य होणार नाही. मात्र, त्यानंतर दोन ते तीन दिवसांत मंत्रालयात सुमारे एक तासाची सविस्तर बैठक घेण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले. या बैठकीला रिंग रोडबाधित शेतकरी प्रतिनिधी, एमएसआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पालकमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत.

'मुख्यमंत्र्यांना राखी बांधायची होती...'

रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधता न आल्याची खंत व्यक्त करणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच राख्या बांधल्या. प्रतिनिधी स्वरूपात चार ते पाच महिला शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही महाजन यांनी दिले. या महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधून, 'आमचे घरदार, शेती आणि संसार वाचवा; आमच्या मागण्यांवर न्याय्य निर्णय घ्या,' असे साकडे घालणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT