

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मृद व जलसंधारण विभागात तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या पदांना मुहूर्त लागला आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये नवीन कार्यकारी अभियंत्यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. अधीक्षक अभियंता हरिभाऊ गिते यांनी रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. १८ ऑगस्ट रोजी 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात आला. त्यानिमित्त जिल्हा मुख्यालयांवर 'वॉकेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता अर्थात जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश दिले.
विभागातील नाशिक आणि अहिल्यानगर वगळता, इतर जिल्ह्यांमध्ये जि.प. तसेच राज्यस्तरावरील कार्यकारी अभियंत्यांची पदे दीर्घकाळ रिक्त होती. त्यामुळे योजना अंमलबजावणीवर परिणाम होत होता. आता पदोन्नतीमुळे विभागातील प्रशासकीय यंत्रणेला बळ मिळणार आहे.
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना आदेश निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांत नवीन पदावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नती आणि नवीन पदस्थापनांमुळे नाशिक विभागातील जलसंधारणाच्या प्रलंबित योजनांना गती मिळत विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक जिल्ह्यात किरण उद्गले यांची पदोन्नतीने जि. प. लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपअभियंता अंकिता वाघमारे यांची पदोन्नतीने मृद व जलसंधारण कार्यकारी अभियंता पालघर येथे नियुक्ती झाली. जळगावमध्ये संतोष पाटील यांची जि. प. लघुपाटबंधारे येथे, राहुल मानकर यांची मृद व जलसंधारण विभागात, तर रणजित नाईक यांची लातूरच्या मृद व जलसंधारण विभागात पदोन्नतीने नियुक्ती झाली.
धुळ्यात नीलेश पाटील यांची जि. प. लघुपाटबंधारे येथे, सचिन शिंदे यांची मृद व जलसंधारण विभागात नियुक्ती झाली. नंदुरबार जिल्ह्यात सागर भराडे यांची जि. प. लघुपाटबंधारे येथे बदली झाली. सचिन वानरे यांची मृद व जलसंधारण विभागात, तर विवेकानंद मगर यांची धाराशिव येथे, संजय नाईक यांची नांदेड येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली. अहिल्यानगरमध्ये प्रशांत काकडे यांची जि. प. लघुपाटबंधारे, तर आनंद रूपनर यांची जि. प. लघुपाटबंधारे छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली.