नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ३) मुंबईकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईचा शेतकऱ्यांनी तीव्र निषेध करीत, पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत पोलिस ठाणे सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने, रात्री उशिरापर्यंत पेच निर्माण झाला होता.
रिंगरोड बाधित शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडे योग्य अलाइनमेंट, न्याय्य मोबदला आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण या मागण्यांसाठी सातत्याने बैठकीची मागणी करत आहेत. निवेदने व पत्रव्यवहार करूनही ठोस निर्णय न झाल्याने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करणार होते.
शेतकरी प्रतिनिर्धीच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाबाबत मुंबई पोलिसांशी आवश्यक पत्रव्यवहार केला होता. मात्र, परवानगी नसल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. शेतकरी मुंबईकडे रवाना झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना आंदोलनास परवानगी नसल्याचे कळविल्याने आंदोलकांना अडवून ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांना त्यांच्या निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
तर मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी मुंबई नाका येथे जमलेल्या शेतकऱ्यांचीही पोलिसांनी धरपकड केली. यात महिला, ज्येष्ठ शेतकऱ्यांचा समावेश आहे. सर्व शेतकऱ्यांना पोलिस वसाहतीतील गुन्हे शाखा युनिट एकच्या मागे असलेल्या बॅरेक ६ मध्ये ठेवण्यात आले. आंदोलनात शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, सुभाष गायकर, आशिष हिरे, वैभव दळवी, नाना पालखेडे, आकाश जाधव, शुभम देशमुख, बॉबी निकम, गोरख जाधव, अलीम सय्यद, शाहरुख मन्सुरी, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
ज्येष्ठ नागरिक, महिला ताब्यात
पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक तसेच महिला शेतकऱ्यांनाही ताब्यात घेतले. मुंबई नाका येथून शेतकऱ्यांची धरपकड केली. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत, प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध केला. तसेच बैठक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.
आम्ही संघर्षासाठी नव्हे, तर चर्चेतून न्याय मिळावा, या अपेक्षेने मुंबईला जात होतो. मात्र, आमचा आवाज ऐकून घेण्याऐवजी शेतकऱ्यांना अटक केली. हा प्रकार संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकारावर घाला घालणारा आहे. आमचा विकासाला किंवा रिंगरोड प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली जमिनी अन्यायकारक मोबदल्यात घेण्याचा प्रयत्न सहन करणार नाही.करण गायकर, संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना